You are currently viewing घुमे रानात पारवा

घुमे रानात पारवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

*घुमे रानात पारवा*

येता शिशिर लाजरा
मज झोंबतो गारवा
वारा अल्लड वाहता
घुमे रानात पारवा

दव न्हावुनी भिजली
पाने फुले रान वेली
गारठ्याने शहारुनी
पशुपक्षी सारी गेली

नांगराला जुंपूनिया
घाम गाळीतो शेतात
कणसांनी बहरुनी
पीक डुलते डौलात

रान हिरवे हासते
शाल अंगी पांघरुनी
थेंब थेंब मोत्यावानी
बरसती ढगांतुनी

रानी फुलतो पळस
जशी लाली अधराशी
रातराणी दरवळे
सुख मनाच्या तळाशी

शीळ गुंजते हवेत
दाणे टिपतात पक्षी
नभी इंद्रधनुष्याची
दिसे शोभिवंत नक्षी

नदीनाले काठोकाठ
ओसंडुनी वाहताना
तन मन भारावले
नेत्रसुख लुटताना

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा