You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद,शाखा सावंतवाडी व ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेच्या संयुक्त विद्यमाने पार पडले बालसाहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषद,शाखा सावंतवाडी व ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेच्या संयुक्त विद्यमाने पार पडले बालसाहित्य संमेलन

*ग्रंथदिंडी, बाल परिसंवाद, लेखकाची मुलाखत, बाल काव्यसंमेलन, बालसंसद, बालरंजन विविधांगी कार्यक्रमांची होती मेजवानी*

 

सावंतवाडी / मळेवाड :

शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते तसेच पुढच्या वर्षी पासून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून बाल साहित्य संमेलन,बाल संसद आयोजन करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग निश्चितच पुढाकार घेईल असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी व्यक्त केला.

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी आणि मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून मळेवाड कुलदेवता विद्यामंदिर शाळा क्रमांक ०२ मध्ये बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात मळेवाड केंद्रातील एकूण सहा सहभागी झाल्या होत्या. राणी पार्वतीदेवी जिल्हा परिषद शाळा क्र.०१ पासून मळेवाड जकात नाका पर्यंत ग्रंथ दिंडी देखील लहान मुलांनी काढली. या ग्रंथदिंडी पालखीमध्ये ग्रंथ घेऊन महाराष्ट्राच्या लोककला, इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तींच्या वेशभूषा सहित शाळेच्या मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने व मता सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आले.

संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कवयित्री उषा परब, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी अध्यक्ष पत्रकार संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, प्रा. सुभाष गोवेकर, सरपंच मिनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे, कविता शेगडे ,अर्जुन मुळीक ,महेश शिरसाट, अमोल नाईक, गिरीजा मुळीक, मधुकर जाधव ,शेजल नाईक, समृद्धी कुंभार, उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, महादेव देसाई, दीक्षा आडारकर ,लवू सातार्डेकर, संध्या बिबवणेकर, संगीता राळकर, जयश्री हरमलकर, नम्रता देऊळकर, शीतल वेंगुर्लेकर, संजय बांबुळकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी भरत गावडे, खजिनदार डॉ.दीपक तुपकर , सदस्य कवी दीपक पटेकर ,सहसचिव राजू तावडे, ऋतुजा सावंत भोसले, प्रज्ञा मातोंडकर, रामदास पारकर, प्रा. रुपेश पाटील, मिनल नाईक जोशी व पदाधिकारी उपस्थित होते.

संमेलनाचे उद्घाटन बाल साहित्य सभेच्या अध्यक्षा कुमारी निकिता टिकस ही विद्यार्थिनी होती, प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपातळीवर वरील खेळाडू कु.वैष्णवी मुळीक तर उद्घाटक पदी दिव्यांग विद्यार्थिनी कुमारी सुचिता कारूडेकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी बालसाहित्य सभेची अध्यक्षा कुमारी निकिता टिकस म्हणाली, मोबाईलच्या जमान्यामध्ये साहित्य निर्माण करणारे बाल साहित्य संमेलन होत आहे त्याचा आनंद आहे. या संमेलनातून निश्चितच साहित्य निर्मितीचा संदेश मिळेल. बालसाहित्य निर्माण व्हावेत म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचा उद्देश खूपच छान आहे. हे पहिलेच बालसाहित्य संमेलन होते जिथे कोणीही लोकप्रतिनिधी, नेता किंवा अन्य कोणीही अध्यक्ष, उद्घाटक नसून शाळेच्या विद्यार्थिनीचा अध्यक्ष व उद्घाटक म्हणून गौरव करण्यात आला.

गटविकास अधिकारी वासुदेव नाईक म्हणाले,बाल साहित्य संमेलन होत आहे त्याचा आनंद आहे. कोकण मराठी साहित्य परिषद बाल साहित्यिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दिशा मिळेल. तर गटशक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी देखील उपक्रमाचे कौतुक केले. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड संतोष सावंत यांनी विद्यार्थ्यांना साहित्याविषयी कुतुहल असते त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर उद्याचे साहित्यीक निर्माण होतील या अपेक्षेने उपक्रम हाती घेतला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षण विभागाने शाळा स्तरावर दरवर्षी साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी व मुलांमध्ये साहित्य व मराठी भाषा वाढीसाठी बाल साहित्य संमेलने घ्यावीत अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या माध्यमातून करीत आहोत असे स्पष्ट केले यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने जी मागणी केली आहे ती निश्चितपणे पुढील वर्षापासून क्रीडा महोत्सव वगैरे उपक्रम राबविले जातात त्याचप्रमाणें साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी बाल साहित्य महोत्सव संमेलन घेतली जातील असे स्पष्ट केले.

या बालसाहित्य संमेलनात “मोबाईल मुलांचा मित्र की शत्रू” यावर मुलांचा परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादात मुलांनी अतिशय सुंदर विचार मांडले. कु. दुर्वा शेवडे ही विद्यार्थिनी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होती. लेखकाची मुलाखत हा सुद्धा कार्यक्रम लेखिका कवयित्री श्रीम.उषा परब यांची मुलांनी बहारदार मुलाखत घेत अतिशय उत्तमरीत्या पार पडला. बाल काव्यसंमेलनात सर्वच शाळांच्या मुला मुलींनी सुरेख कविता सादर केल्या. काव्य संमेलनाची अध्यक्षा कु.आर्या मुळीक हिच्या कविता मात्र भाव खाऊन गेल्या. भोजनानंतर दुपारच्या सत्रात बालसंसद हा आगळावेगळा कार्यक्रम मुलांनी, कोमसाप पदाधिकारी, आणि शिक्षकांनी सादर केला. यात न्यायाधिशाच्या भूमिकेत प्रा.सुभाष गोवेकर तर पालक आरोपी श्री.दीपक पटेकर, मंगल नाईक जोशी आणि शिक्षक आरोपी साळसकर सर, उपशिक्षक लवू सातार्डेकर आणि वकिलाची भूमिका कुमार मनीष सहदेव मेस्त्री यांनी वठवली. अशिल म्हणून प्रशालेची मुले होती. बालरंजन हा मुलांच्या पसंतीचा, हास्यकल्लोळ करणारा बहारदार कार्यक्रम राहुल विठ्ठल कदम यांची मिमिक्री, सुधीर धूमे यांचे किस्से आणि कोमसापचे रामदास पारकर यांच्या पक्ष्यांचा शिट्टीतून संवाद असा पार पडला. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन कुमारी मंगल मुळीक आणि कुमारी आर्या मुळीक यांनी केलं. कु.मंगल मुळीक हीचे शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी देखील विशेष कौतुक केले.

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. कोमसाप शाखा सावंतवाडी,मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, मळेवाड केंद्रप्रमुख म. ल.देसाई, सर्व शाळा, हायस्कूल मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि ग्रामस्थ, पालक आदींच्या सहकार्यातून बालसाहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा