You are currently viewing सत्यशोधक विचार आणि सामाजिक क्रांतीची प्रखर मशाल:- ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले

सत्यशोधक विचार आणि सामाजिक क्रांतीची प्रखर मशाल:- ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*लेखिका शिवकन्या प्रा.कु.श्रद्धा नंदकुमार शेट्ये लिखित अप्रतिम वैचारिक लेख*

🌹 *सत्यशोधक विचार आणि सामाजिक क्रांतीची प्रखर मशाल:- ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले* 🌹

*”अर्पुनी सर्वस्व समाजात आणली शिक्षणाची गंगोत्री*
*स्त्री शिक्षणाचे प्रणेते पण अन् अग्रदूत ज्योतिबा सावित्री*
*सामाजिक क्रांतीची प्रखर मशाल सर्वत्र पेटवली*
*सत्यशोधक विचारांची समाजात मुहूर्तमेढ रोवली.”*
समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्री मुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातील महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले हे पहिले दाम्पत्य आहेत. या उभयतांनी स्त्री पुरुष समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारून तत्कालीन रूढी प्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज देण्याचे कार्य केले. बालविवाह प्रतिबंध आणि विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिमतीने पार पाडले.

व्यक्ती समाजात जन्माला येते आणि समाजातील अनेक प्रघातांचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. ज्यावेळी समाजजीवनाचा तोल ढासळतो, तत्त्वांना ग्लानी येते, नीतीचा विपर्यास होतो अशावेळी महापुरुष घडले जातात, जे समाजाला सावरण्याचा नवचैतन्य देण्याचा प्रयत्न करतात. असे महापुरुष वेदनांच्या वाटेवर चालत असतात. मानखंडना वा टाकीचे घाव सहन करण्याची शक्ती त्यांच्या अंगी असते. सत्याच्या दिशेने धाव घेणे हा त्यांचा मनोधर्म असतो आणि त्यांच्या पावलांनी तयार होणारी वाट लोकजीवनात नव्या जाणिवांची पहाट घेऊन येते. “सामाजिक गुलामगिरी” चा अंधार सर्वत्र दाटला असताना ज्यांच्या पावलांनी “सार्वजनिक सत्यधर्माची पहाट” सर्वत्र उगवली ते म्हणजे “महात्मा ज्योतिराव फुले” आहेत.

महात्मा फुले यांच्या काळातील समाज तेजोहीन झाला होता. इतिहासाने पाहिलेली सळसळत्या रक्ताची आणि धगधगत्या रक्ताची दौड थांबली होती. मोडकळीला आलेल्या वर्णव्यवस्थेच्या वाड्यात “जातीयतेची चूल” मांडून न पावणाऱ्या देवासाठी नेवेद्य करण्यात समाज गढून गेला होता. माणसांना माणसांची आठवण आणि वास्तवाचे भान दोन्ही उरले नव्हते. *”श्रीमंतांनी आपले सुख आणि गरिबांनी आपले दुःख जपून ठेवायचं, स्त्रियांनी पायाची दासी म्हणून जगायचं, दलितांनी जनावरांचे जीवन कंठायचे, शेतकऱ्यांनी पोरांबाळांचे हाल पहायचे”* अशी ही जीवनाची घसरणआणि परवड सुरू होती.

महाराष्ट्रातील महान समाजसुधारक व दलितांचे उद्धारकर्ते ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणेच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व दलित्धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले होत्या. ज्याकाळात स्त्रीला समाजामध्ये मानाचे स्थान मिळत नव्हते; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्य पासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी व पारतंत्र्यात ठेवले जाई त्याकाळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यांना ज्योतीबांच्या उदार दृष्टिकोनामुळे स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली.

 

ज्योतिबा एक अभ्यासक आणि उत्तम विचारवंत होते. त्यांचे “अखिल जीवन आचार-विचारांचा यज्ञ” होता. त्यांच्यावर “ख्रिस्तप्रणित ईश्वरनिष्ठ मानवतावाद” आणि ख्रिस्त धर्मोपदेशकांचे समर्पित जीवन यांचा संस्कार झाला होता. यामुळे त्यांच्या विचारांना परिपक्वता प्राप्त झाली होती. महात्मा फुले हे “थॉमस पेन” यांच्या विचारांनी प्रेरित झाले होते. त्यांचे लेखन आणि विचार महात्मांनी आत्मसात केले. थॉमस पेन यांनी “मानवाची प्रतिष्ठा”, “व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह” आणि “गुलामगिरीचा निषेध” हा “तत्वत्रय सिद्धांत” मांडला. ज्योतिबा वाचत होते आणि सांगतही होते. ते स्वतः “सार्वजनिक सत्यधर्माचे प्रवक्ते” होते. “दावालनाची दाहकता” प्राप्त झालेली त्यांची लेखणी “अंधश्रद्धा आणि अनामुषता” यांचे दहन करण्यास अधीर झाली होती.

ज्योतीबांच लेखन धारदार होतं. “रानफुलांचा औषधी गुणधर्म” घेऊन प्रकट होणार साहित्य “ज्योतीचे तेज आणि तप्तता” घेऊन अवतीर्ण होत होतं. आपल्या कार्यप्रचारासाठी त्यांनी आमरण लेखणी झिजवली. त्यांनी *’गुलामगिरी'(१८७३), ‘शेतकऱ्यांचा आसूड'(१८८३), ‘इशारा'(१८८५), ‘सत्सार अंक १ आणि २’ (१८८५)* हे साहित्य लेखन आपल्या धारदार वाणीने आणि परखड पण सत्य विचारांनी केले. १८८९ मध्ये त्यांचे अर्धांगवायुने उजवे अंग झालेले असूनही विकलं झालेले असूनही *”सार्वजनिक सत्यधर्म”* हे पुस्तक त्यांनी डाव्या हाताने लिहिले. *”मनाच्या कडेने केलेले तेजस्वी लेखन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाचाच आहे.”*

अनेक समकालीन विचारवंत आणि समाजसुधारक *”समाजाचे कल्याण आणि प्रगती”* याबद्दल आपले मत व्यक्त करत होते. पण समाजहित म्हणजे नेमके काय? हा मतभेदाचा आणि महत्त्वाचा मुद्दा होता. यावर महात्मा फुले यांनी त्यांना जाणवत असलेलं *’विदारक समाजदर्शन’* परखडपणे मांडलं त्यांच्या मते, उच्चवर्णीयांचं आणि शूद्रातिशूद्रांच्या हित आणि धनिकांचे अन् श्रमिकांचे हित सारखे नाही. कारण समाज हा दुभंगलेला दिसून येतो. समाजाचे *’शोषक आणि शोषित’* असे दोन भाग पडले आहेत. *’शेतकरी हा समाजाचा कणा’* पण तो *’सावकारी पाशात’* अडकलेला आहे. *”सावकारशाही, भिक्षुकशाही आणि नोकरशाही”* यांनी तो गांजलेला आहे. *”दीनदलित आणि स्त्रियांना तळागाळात व्यवस्था धर्मशास्त्राने ईश्वरप्रणित आणि अपौरुषय आहे मानली आहे. शूद्रातिशूद्रांना कोणी कैवारी नाही.”* असे विचार त्यांनी व्यक्त केले. ज्योतिबा *”पराकाष्टाचे आस्तिक होते पण अंधश्रद्धाळू मात्र नव्हते.”* म्हणूनच या महापुरुषाने कालचक्राला कलाटणी देण्याचा निर्धार केला. समाज आरोग्यदायी मानसिकतेने व निकोप करायचं असेल तर आधी तळागाळातील आणि शोषित घटकांना विदारकता हिला विदारकता वाजला योजना अन्याय अत्याचार आणि गुलामगिरी मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल असे त्यांचे स्पष्ट आणि धारदार मत होते.

ज्योतिबा 40 वर्षे समाजकार्यासाठी आणि तळागाळातील व्यक्तींची परिस्थिती बदलण्यासाठी चंदनासारखे झिजले. त्यांनी व्याख्यान दिले, लेख लिहिले आणि आपले विचार समाजाला अखंडपणे देत राहिले. त्यांनी *”स्वातंत्र्य, समता, लोकशाही, विज्ञान, इहवाद”* या आधुनिक जीवन मूल्यांची रुजवण केली. त्यांनी आपल्या या कालचक्राच्यापलीकडे जाणारा विचारांनी सर्वधर्मसमभावाची वार्ता करणाऱ्या आधुनिकांनाही मागे टाकले होते. आपल्या समाजक्रांतीच्या कार्यास स्थिर स्वरूप देण्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ यादिवशी *’सत्यशोधक समाजाची स्थापना’* केली. तसेच *’सार्वजनिक सत्यधर्म’* हे पुस्तक लिहून सत्यशोधक समाजाची *तत्त्वप्रणाली आणि आचारसंहिता* सर्वांपुढे ठेवली. *’सर्व सुखाचे आगर, नीतीतत्वांचे माहेर’* असा अशा सत्याच्या या संशोधक, उपासकाने २७ नोव्हेंबर १८९० रोजी सार्वजनिक सत्यधर्म बहाल केले.

लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्यांचे हाल पाहून त्यांचे काळीज पिळवटून निघत असे. अमानुष, अमानवी रूढी-परंपरा व कर्मकांडांविरुद्ध त्यांचं मन पेटून उठले होते. त्यांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केली व खऱ्या अर्थाने *’सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत’* त्या झाल्या. त्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह १३ वर्षांच्या ज्योतिबा फुले यांच्याशी इ.स. १८४० मध्ये झाला. त्या ज्योतिबा यांच्या सहवासात व संस्कारात ५० वर्षे राहिल्या. वयाच्या १०व्या वर्षापासून त्यांनी अक्षर ओळख करून घेतली. ज्योतीबांच्या मनात *’स्त्री शिक्षणविषयक विचार’* प्रबळ होऊ लागले. सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य या उभयतांनी केले.

*’शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका’* इ. अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातील स्त्रीदास्यत्व मिटवण्यासाठी स्त्रियांनी शिकून स्वावलंबी बनावं म्हणजे त्यांना आपल्या खऱ्या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी परत करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असं ठाम मत स्त्रियांपुढे मांडलं. *’अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद’* मिटवण्यासाठी या दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. काही धर्ममार्तंडांनी धर्म बुडाला अशी ओरड केली व सावित्रीबाईंवर *’धर्मबुडवी’* म्हणून शेणमाती व दगड फेकू लागले. तरीदेखील त्या मागे हटल्या नाहीत. अस्पृश्यांना शिकल्यामुळे सनातन मंडळी जास्तच चिडली. त्यांनी ज्योतीबांच्या वडिलांना सामाजिक बहिष्काराची धमकी दिली. यामुळे या दांपत्याला घराबाहेर पडावे लागले. अशाही परिस्थितीत सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. ज्योतिबांना पूर्णपणे साथ देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. ज्योतीबांनी सर्वप्रथम त्यांना शिक्षित केले आणि त्यांच्यात शिक्षिका होण्याचा होण्याची गुणवत्ता निर्माण केली. इ. स.१८४८ ते १८५२ पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या.

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी *’नेटिव्ह फिमेल स्कूल दि सोसायटी फॉर प्रोमोटींग एज्युकेशन’* या संस्था स्थापन केल्या. त्यानंतर पुणे शहर व परिसरात २० शैक्षणिक संस्थांचं जाळं पसरवलं. तसेच शाळेतील मुलींची गळती थांबवण्यासाठी *’विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता’* आणि *’आवडेल ते शिक्षण’* देण्यावर भर दिला. एकोणिसाव्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली ही कामगिरी अद्वितीय ठरली. त्यांच्या शाळांमध्ये *’अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण’* याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाई. परिणामी, शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांपेक्षा दहा पटीने वाढली. तसेच या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतील मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. यामुळे या उभयतांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची प्रशंसा सर्वदूर झाली.

ज्योतीबांनी *’समाजाची दशा व दिशा’* समजावून सांगितली आणि सावित्रीबाईंनी *”स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्याचा वसा घेतला.”* दीनदलित स्त्रियांची गुलामगिरी त्यांना अस्वस्थ करत होती. विचारांचा कल्लोळ उठत होता. यातूनच त्या कवयित्री झाल्या. १८५४ साली त्यांचा *’काव्यफुले’* हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहातील फुलांविषयांच्या कवितांचा अविष्कार अत्यंत आधुनिक आहे. त्यांच्या लेखणीतून *’मानवी नराच्या भ्रमरवृत्तीवर प्रतीकरूपाने’* प्रकाश पडला आहे. तसेच *’स्त्री शोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर’* प्रहार केला आहे. या कवितांमधून *’मानवी भावभावनांचे दिग्दर्शन निसर्गप्रतीकातून’* अचूकपणे आणि समर्थपणे त्यांनी केली केले.

ज्योतिबांना *ज्ञानसूर्य* मानणाऱ्या महान कवयित्री *अठराव्या शतकातील पूरक व प्रेरणादायी कवयित्री* सावित्रीबाई होत्या. जुलै १८८७ मध्ये ज्योतिबांना पक्षाघाताचा आजार झाला. त्यावेळी सावित्रीबाईंनी त्यांची अहोरात्र सुश्रुषा केली. *२८ नोव्हेंबर १८९०* रोजी या आजारात जोतिबांचे निधन झाले. अंत्ययात्रेच्या वेळी करण्यासाठी यशवंतला दत्तक मुलगा असल्याने सर्व विरोध करू लागले. तेव्हा सावित्रीबाई ध्येयाने पुढे आल्या व त्यांनी ते स्वतः धरले. तसेच अग्नीही त्यांनीच दिला. यशवंत हे विधवेचे पुत्र असल्याने त्यांना कोणीही मुलगी देत नसते. अशावेळी सावित्रीबाईंनी आपले कार्यकर्ते *ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे* यांच्या *राधा* नावाच्या मुलीशी यशवंत चा विवाह *४ फेब्रुवारी १८८९* रोजी करून दिला. महाराष्ट्रातील आंतरजातीय विवाह हाच होता.
ज्योतीबांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतली. १८९३ रोजी सासवड येथे झालेल्या *’सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद’* त्यांनी भूषवले. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला १८११ साली ज्योतीबांचे एक *’पद्ममय चरित्र’* त्यांनी लिहिले, ज्याचे नाव *”बावन्नकशी सुबोध रत्नाकर”* होय. हे काव्यचरित्रग्रंथ त्यांनी स्वतः लिहिलेले आहे. यामध्ये *’52 कडवी’* आहेत. लग्न झाले तेव्हापासून ज्योतीबांनी आपली पत्नी सावित्री आणि *’आऊ सगुणाबाई’* यांनासुद्धा शिक्षणाचे पाठ देत असत असा उल्लेख या चरित्रात केलेला आहे. तसेच यामध्ये कृतज्ञतेची भावना अभिव्यक्त झालेली आहे.

*”जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगाते उद्धारी.”*

सावित्रीबाईंनी या उक्तीस प्रत्यक्ष कृतीत उतरवून मुलींच्या शिक्षणासाठी आणि समाजातील स्त्रियांच्या परिस्थितीला बदलण्यासाठी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. ज्योतिबांनंतर त्यांच्या *’स्त्री शिक्षण, स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता’* या कार्यांना सावित्रीबाईंनी गती दिली. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्या सावलीसारख्या त्यांच्यासोबत असायच्या. *’सेवा व करुणेचा आदर्श’* त्यांनी समाजापुढे ठेवला. सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य नव्हते. पण दीनदलितांना व अनाथांना जवळ करून त्यांनी स्वतःच्या अपत्याप्रमाणे प्रेम, आपुलकी दिली. ज्योतीबांच्या कार्यात त्यांची साथ अनमोल होती. सर्व टीका, छळ सहन करून समाज सुधारण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांना अनेकांनी त्यांच्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे कार्य अविरतपणे सुरूच राहिले. या सर्व कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता. त्यांच्याकडे *विलक्षण चिकाटी व कठोरपणा* होता.

सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्षशीर्षक
आणले. अध्यापनाचे काम करत असताना त्यांच्या मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक छळ समाजाने, नातेवाईकांनी, सनातन्यांनी केला. अंगावर शेणाचे गोळे,कचरा टाकणे हे सर्व कृत्य त्यांना विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन असल्याचे वाटत होते. अशा अनेक संकटांना त्या खंबीरपणे तोंड देत होत्या. समाजातील स्त्रियांची दयनीय अवस्था त्यांनी पाहिली होती आणि समाजाचे स्त्रियांविषयी असलेले संकुचित आणि पुरोगामी विचार त्यांना मान्य नव्हते. केशवपनाची दुष्टप्रथा, स्त्रियांना अपशकूनी ठरवणे या सगळ्या गोष्टी त्यांना अस्वस्थ करत होत्या. ज्योतीबांच्या कालचक्राला कलाटणी देणाऱ्या कार्यासाठी सावित्रीबाईंनी अखंड मोलाची साथ दिली. त्यांच्यानंतर त्यांचे कार्य तितक्याच समर्थपणे सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी केले. १८९७ मध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. हा जीवघेणा आजार अनेकांचे प्राण घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यातच *१० मार्च १८९७* रोजी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ज्योतीबांच्या *’समता, सत्यपरायणता, मानवतावाद’* या तत्त्वांचा अंगीकार सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर करून आपलं जीवन व्यतीत केलं होतं आणि समाजकार्यासाठी आपल्या पतीप्रमाणे त्यादेखील चंदनासारख्या झिजल्या होत्या.

शब्दांकन:- शिवकन्या. प्रा.कु. श्रद्धा नंदकुमार शेट्ये
खोपोली, जि. रायगड
दूरध्वनी क्र. 966547699
Email-id:- shradhashetye90@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा