उपवनसंरक्षक कार्यालय व बांधकाम समोर ठिय्या; १५ दिवसात काम सुरू करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन..
सावंतवाडी
चौकुळ-मळववाडी ते चुरणीची मुस रस्त्याचे व पुलाचे रखडलेल्या काम तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी ग्रामस्थांनी येथील उपवनसंरक्षक कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान सर्व त्रुटी पूर्ण करून येत्या पंधरा दिवसात या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दोन्ही विभागांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले.
यावेळी सरपंच सरेश शेटवे, माजी सरपंच गुलाबरावं गावडे, बाळा गावडे, संजू गावडे, पांडुरंग गावडे, सुरेश गावडे, बापू गावडे, गंगाराम गावाडे, सुभाष गावडे, संजीव गावडे, संतोष गावडे, दिनेश गावडे, तर चौकुळ चूरणीची मुस वं बेरडकी येथील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पीएमजेएसवायचे कुडाळ येथील अधिकारी, आंबोली वनक्षेत्रपालं विद्या घोडगे, वनकर्मचारी उपस्थित होते. चौकुळ येथील मळववाडी तें चूरणीची मुस हे पाच किमीचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झाले आहे या कामाला वर्क ऑर्डर देऊन दोन वर्षे होत आली तरी ती सुरु करण्यात आले नाही. शिवाय यातील तीन किमीचा रस्ता वनखात्याच्या जमिनीतून जातं असून त्याला ना हरकत दाखला वनविभागाने दिला नव्हता. चौकुळ मधील बेरडकी, चूरणीची मुस येथील रस्ता तसेच या भागातील सतरा किमी परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे, येथील भावई मधीर कडील मंजूर पूल गेली कित्येक वर्षे रखडली आहेत. याप्रश्ननि जाब विचारण्यासाठी चौकुळ ग्रामस्थांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपवनसंरक्षक कार्यालय येथे ठिय्या आंदोलन पुकारले. यावेळी चौकूळ चूरणीची मुस रस्त्या प्रश्ननि उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. गेल्या दोन वर्षात पीएमजेएसवाय यांच्याकडून आपणास प्रस्ताव आलेला नाही असे तें म्हणाले. या रस्त्यासाठी वनखात्याची जी जागा जातं आहे त्याचा सर्व्हे मंगळवारी तातडीने करून त्यासाठी लागणारी परवानगी तात्काळ दिली जाईल असे आश्वासन रेड्डी यांनी दिले. तर वनवीभागाचे अधिकारी तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन हा सर्व्हे केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले तसे लेखी आश्वासनानंतर वनवीभाग समोरील ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.