जळगाव स्वायत्त्य प्रताप महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश
कणकवली
कवी अजय कांडर यांच्या “बाया पाण्याशीच बोलतात” या बहुचर्चित कवितेचा यापूर्वी मुंबई विद्यापीठ एफ वाय बीए, सोलापूर विद्यापीठ एफ वाय बीए आणि बालभारती नववी आदी तींन अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर आता जळगाव येथील स्वायत्त प्रताप महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात यावर्षीपासून तिचा समावेश करण्यात आला आहे.
“बाया पाण्याशीच बोलतात” ही कविता 2001 च्या मौज दिवाळी अंकात पहिल्या वेळी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर या कवितेकडे अभिजात साहित्य रसिकांचे लक्ष वेधले गेले. याच पार्श्वभूमीवर ही कविता प्रथम मुंबई विद्यापीठाच्या एफ वाय बीएच्या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आली, त्यानंतर तिची बालभारती नववीच्या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आणि दोन वर्षांपूर्वी या कवितेचा सोलापूर विद्यापीठाच्या एफ वाय बीएच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला.आता या वर्षापासून (२०२२- २३) “बाया पाण्याशीच बोलतात” या कवितेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालय, अमळनेर- जळगाव येथे बीए प्रथम वर्ष मराठी या वर्गाच्या द्वितीय सत्रासाठी “विशिष्ट वाङ्मय प्रकार: कविता” या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
“बाया पाण्याशीच बोलतात” ही कविता मौज मध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्या कवितेवर ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सोमनाथ कोमारपंत यांनी स्वतंत्र समीक्षक लेख लिहिला होता. त्यानंतर या कवितेचा ज्येष्ठ अनुवादक आणि मराठी कवितेचे अभ्यास चंद्रकांत पाटील यांनी हिंदीत अनुवादित करून 60 नंतरची मराठी कविता या हिंदी ग्रंथात तिचा समावेश केला. या कवितेवर स्वतंत्र नाटिकाही सादर करण्यात आली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी अजय कांडर यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. या कवितेमुळे कोकणातल्या पाणीटंचाईचा प्रश्न प्रथमच मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आला.