पंचम खेमराजचे आयोजन; युवराज लखम राजेंची संकल्पना
सावंतवाडी
सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम राजे भोसले यांच्या संकल्पनेतून श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने ५ ते ८ जानेवारी या काळात सावंतवाडी-राजवाडा येथे दशावतार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील सात नामवंत दशावतार कंपन्यांचे नाट्यप्रयोग राजवाडा येथे सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल यांनी दिली. या महोत्सवात चेदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे गौरी स्वयंवर, वालावकर दशावतार नाट्य मंडळाचे वेदराहूचे ग्रहण चंद्र सूर्याचे, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे कर्ण पिशाच्च अर्थात अर्धसत्य, खानोलकर दशावतार मंडळाचे पालीचा बल्लाळेश्वर, दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचे शेषात्मज गणेश, महापुरुष दशावतार मंडळाचे प्रलयकारी गणेश आणि नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे बहुवर्मा पुत्र प्राप्ती हे सात नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. हे नाट्यप्रयोग सायंकाळी साडेसहा ते आठ आणि साडेआठ ते दहा या काळात होणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजघराणे व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे