You are currently viewing नवी वाट चालताना “

नवी वाट चालताना “

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम लेख*

*” नवी वाट चालताना “*

एक जानेवारी तारीख उजाडली. नवीन वर्षाचा पहिला दिवस. २०२३ सालाने दिमाखात प्रवेश केला आहे. आता,

*नवे वर्ष नव्या आशा*
*नव्या स्वप्नांना नवीन दिशा*

मिळणार आहेत. या वर्षाच्या पोटात असंख्य गुपिते असणार आहेत. काही आनंदाचे क्षण, प्रगतीच्या, भरभराटीच्या संधी, काही मोठ्या स्वप्नांची परिपूर्ती, नवीन नात्यांची जुळणी असणार आहे. प्रत्येकासाठी काही ना काही आनंदाची भेट नक्की असणार आहे.
एखादं वर्ष म्हणजे दिनदर्शिकेच्या तारखेप्रमाणे दिवस आणि पानांप्रमाणे महिना उलटून ‘मागील पानावरून पुढे चालू’ अशी साधी सरळ प्रक्रिया नसते. तर ती असते प्रत्येकाच्या आयुष्यातील आठवणींची पुंजी, तर समाजाच्या, देशाच्या बाबतीत असंख्य चांगल्या वाईट घटनांचा ठेवा.
म्हणूनच सरत्या वर्षातल्या घटनांचा ताळेबंद मांडून उणे-अधिकाची गोळाबेरीज केली जाते. काही अप्रिय घटनांनी मनाची घालमेल होते. कारण काही नाती दुरावलेली असतात. त्याच वेळी काही नवीन नाती जोडलेलीही असतात. काही गोष्टीत यशाला गवसणी घातलेली असते, तर आगामी नवीन आव्हाने आता खुणावत असतात. काही बेत यशस्वीरीत्या तडीस नेलेले असतात, तर येत्या काळासाठी नवीन बेतांची आखणी सुरू झालेली असते. अशा मनाच्या एका भारावलेल्या अवस्थेतच नवीन वर्षाचे आगमन होत असते. तेव्हा २०२३ सालाचे आपण अतिशय उत्साहाने, आनंदाने स्वागत करू या.
मराठी वर्ष हे चैत्र प्रतिपदेपासून सुरू होते. तेव्हा शिशिराची पानगळ झालेली असते. नव्या कोंबातून कोवळी पोपटी चैत्र पालवी फुटते. ही लवलवणारी नाजूक पाने हळूहळू हिरवी होत झाड हिरवेगार होत झुलू लागते. पुढे नाजूक कळ्या, कोमल फुले, मधुर फळे असा बहर अनुभवत पुन्हा शिशिराची पानगळ सुरू होते. जुन्या वर्षाची सांगता आणि नव्या वर्षाचे आगमन असे निसर्गाच्या अविष्कारातून साजरे होत असते.
पण जागतिक वर्षाचा कालखंड वेगळा आहे. त्याचे स्वागतही वेगळ्याच पद्धतीने होते. जागतिकीकरणाने या सर्व गोष्टी आता जगभर उत्साहात साजऱ्या केल्या जातात. हिवाळ्याच्या थंडीने शरीरं गारठलेलीअसली तरी नव्याच्या स्वागताच्या आनंदाने प्रफुल्लित मने मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करतात. जागोजागी त्यासाठी रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.
यंदा नव्या वर्षात पदार्पण करताना काही खूप मोठ्या अनुभवांची पुंजी आपल्याकडे जमा झालेली आहे. कारण मागची दोन-तीन वर्षे सर्व जगाच्या दृष्टीने धास्तावणारी गेली. कोविड १९ च्या विषाणूने अख्ख्या जगाला वेठीला धरले होते. ‘न भूतो न भविष्यती’ अशी परिस्थिती ओढवली. अनेक जिवलगांचे हात हातातून अचानक सुटून गेले. मृत्यूचे हे भयानक दर्शन सर्वांनाच मुळापासून हादरवून गेले. हे संकट अनेक गोष्टी आपल्याला शिकवूनही गेले. अशावेळी पैसा, सत्ता, अधिकार काहीही कामाला येत नाही. चांगले शारीरिक, मानसिक आरोग्य या तडाख्यातून सही-सलामत बाहेर आले. माणसांची ओढ, नात्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. पुन्हा नाती जवळ आली. पैशाचा, सत्तेचा, अधिकाराचा अती हव्यास न करता आपल्या मर्यादा, आपल्या गरजा ओळखून संयमी, विवेकी वाटचाल करायला हवी याची जाणीव अतिशय प्रखरतेने झाली.
रोजची एवढी धावाधाव करून पैसा मिळवायचा तो कशासाठी ? तो नक्की किती मिळवायचा ? आपल्या नेमक्या गरजा किती ? नक्की महत्व कशाला ? पैशाला का माणसाला ? अशा मूलभूत गोष्टींचा पुन्हा सर्वंकष विचार करायला सगळ्यांनाच हा मोठा विराम मिळाला होता. सर्वांच्या विचारात काही अंशी फरक पडलाही आहे. पण थोडक्यामधेच समाधान मानून, आपल्या माणसांना धरून राहायला हवे हे मात्र खरे, याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. अजूनही या संकटाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे त्याच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून योग्य ती खबरदारी प्रत्येकाने घेत राहिले पाहिजे. आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी कायमस्वरूपी लावून घेतल्या पाहिजेत.
नव्या प्रगत तंत्रज्ञानात आपल्या देशाने आघाडी घेतलेली आहे. त्यात आता 5G सेवा ही उपलब्ध झालेली आहे. याद्वारे अनेक दैनंदिन व्यवहार सुकर होत आहेत‌. आपणही हे तंत्रज्ञान आत्मसात करून घेऊन नव्या प्रवाहात सामील होणे खूप गरजेचे आहे.

*नवी सुगी नवं पीक*
*सुकाळाची आशा*
*नवं ज्ञान नवं ध्येय*
*उन्नतीची दिशा ||*
आत्ता जागतिक वातावरण तणावपूर्ण आहे. अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी प्रत्येकाने प्राधान्याने देशहित जपले पाहिजे. अनावश्यक खर्च टाळणे, भ्रष्टाचार न करणे, स्वदेशी गोष्टींना प्राधान्य देणे, देशहिताला बाधा पोहोचवेल अशी कोणतीही कृती-उक्ती न करणे, आपली कुटुंब व्यवस्था नीट सांभाळणे अशा कितीतरी गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारा आपला देश अनेक आघाड्यांवर प्रगतीची शिखरे गाठत आहे. त्याच्या उज्ज्वल वाटचालीत प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.

*घालू गवसणी नव्या यशाला*
*सदैव जपू या देशहिताला ||*

नव्या वर्षात पदार्पण करताना या सर्व अनुभवातून आलेले शहाणपण, नवे भान यांचा आपल्याला निश्चितपणे चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचे आगमन प्रगतीची, आनंदाची, उत्तम आरोग्याची पर्वणी घेऊन येणारे ठरो हीच प्रार्थना आहे.

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे ५८

प्रतिक्रिया व्यक्त करा