*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ.मृदुला कुलकर्णी खैरनार लिखित अप्रतिम गझल रचना*
*नवा सूर्योदय…*
गोड कटू जे आपसातले हिशोब त्यांचा मोजावा
वर्ष संपले,वैर संपले डाव नव्याने मांडावा !
काळ धावतो चक्र चालते, मागे कोणी असू नये
चालत जावे काळासंगे मार्ग आपला काढावा
ज्या प्रश्नांना उत्तर नसते, धरुनी त्यांना काय मिळे?
निष्कारण तो तनामनावर ताण घ्यायचा टाळावा
आरोग्याचे महत्त्व मोठे काळाने ते दाखविले
त्याग करावा मग व्यसनांचा, वाम मार्गही सोडावा
नव्या कल्पना नवीन गोष्टी, जोडत जावे नात्यांना
सूर्य उद्याचा जरी तोच तो, पुन्हा नव्याने उगवावा !
डॉ.मृदुला कुलकर्णी
पुणे.30/12/22