*वक्रतुण्ड साहित्य समूहाचे सदस्य लेखक कवी प्रा.डॉ. सतीश शिरसाठ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ढगात बुडालेला चंद्र…*
निळे जांभळे डोंगर
गडद धुक्यात हरवून बसतात,
सैरावैरा धावणारे वारे
अशावेळी गप्प असतात,
घळीतून पाझरणारी बासरीची धून थांबली जाते
कड्यावरच्या फताडया निवडुंगाला जेव्हा
काळोखाची चाहूल लागलेली असते तेव्हा
आसपासची बाभळीची झाडं
उजेडाची लक्तरं उसवू लागतात,
रूईच्या झाडाजवळ
(म्हणतात) बांगडयांचे आवाज येऊ लागतात.
लोक सांगतात,
या डोंगरखो-यातल्या गावात,
एक जाधवांचं घर होतं;
घरात दोघंच…
बाप आणि त्याची विधवा पोर.
सदानकदा ढगांत चंद्र बुडालेला;
तिची दुनिया वेगळीच.
तिला हसताना असं कुणी पाहिलंच नव्हतं;
गावात कुणी फिरस्ता आला…
तिच्या दारापुढं आला भिक्षेला;
गो-या कपाळावरचा हिरवा गोंद पाहून चुकचुकला;
त्याच्या काळ्या कपड्यातल्या तारूण्याला पाहून तिही हळहळली,
रात्री तो गावातून निघून गेला,
ती रात्री घरी आलीच नाही;
सकाळीच लोकांना कडयावरच्या निवडुंगाला
तिच्या लुगडयाला तुकडा
फडफडताना दिसला;
तेव्हापासून लोक म्हणतात,
ती कड्याच्या टोकावर
रूईच्या झाडाजवळ राहते;
खरं खोटं राम जाणे.
…….
@ प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ, पुणे,मो. नं.९९७५४३५१५२