You are currently viewing सावंतवाडी बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची बदली राजकीय हेतूने प्रेरित..?

सावंतवाडी बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची बदली राजकीय हेतूने प्रेरित..?

स्थानिक अधिकारी राजकीय लोकांना का नको असतात..?

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा. नैसर्गिक साधन समृद्धीने नटलेला, कुणालाही हवाहवासा वाटणारा असा हिरवागार निसर्ग, शांत सुंदर समुद्रकिनारे, आल्हादायक वातावरण यामुळे सिंधुदुर्गात येणारा नोकरदार वर्ग जिल्हा सोडून जायला पाहत नव्हता. परंतु गेल्या काही वर्षात ही परिस्थिती एकदम उलटी झाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उच्चस्तरीय अधिकारी वर्ग यायला बघत नाही असे दिसून आले आहे. चांगले अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली बदली वरिष्ठ स्तरावरून वाटाघाटी करून पुन्हा दुसरीकडे करून घेतात अशीच परिस्थिती जिल्हावासियांना पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी कार्यालयातच नव्हे तर रुग्णालयांमध्येही तज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत आणि बदल्या झाल्या तरी जिल्ह्यात येण्यास नाखुश असतात. याचे कारणही दुसरे तिसरे काही नसून राजकीय दबाव हेच आज पर्यंत पाहायला मिळाले आहे.

सावंतवाडी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण या सावंतवाडीतीलच स्थानिक असल्याने आणि गेली काही वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग व त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता पदाचाही कारभार त्यांनी पाहिलेला होता, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्याची त्यांना माहिती होती. जिल्ह्याचा रखडलेला विकास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक अधिकारी यांच्या सहकार्याने वेगात होईल अशी आशा वाटत होती. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार कार्यकारी अभियंता म्हणून अनामिका चव्हाण यांनी स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच तडकाफडकी त्यांची बदली दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी करण्यात आली आणि सावंतवाडीचा कार्यभार कणकवली येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दोन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असे समजते. असे असले तरी चारच दिवसांपूर्वी सावंतवाडी मोती तलावाच्या कोसळलेल्या कठडा कामाचा शुभारंभ महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री नाम.दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला एकाही भाजपच्या नेत्याला बोलवण्यात आले नाही, अशा प्रकारचे वक्तव्य भाजपचे जिल्हाप्रवक्ते संजू परब यांनी करत अनामिका चव्हाण यांना इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची बदली दापोली कृषी विभागात करण्यात आल्याने त्यांची बदली राजकीय हेतूने प्रेरित आहे की काय? अशी संशयास जागा निर्माण झाली आहे. भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या वक्तव्यानंतर 24 तासात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची बदली झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी भोवली आणि भाजपाचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ त्यांची बदली केली अशा प्रकारच्या वावड्या उठायला लागल्या. त्यामुळे राजकीय लोकप्रतिनिधींची मर्जी न सांभाळणारे अधिकारी सत्ताधाऱ्यांना नकोच की काय? अशी शंका येऊ लागली.
अनामिका चव्हाण या सावंतवाडी येथील स्थानिक असून एक स्थानिक महिला उच्चपदस्थ अधिकारी झाली हे खरेतर सावंतवाडी वासियांसाठी भूषण होते.उच्चपदस्थ अधिकारी पदापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी अहोरात्र खडतर मेहनत घेतलेली असते आणि आपल्या अक्कल हुशारी हिमतीच्या जोरावर ते स्थान प्राप्त केलेले असते. अशावेळी अशा अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागातील कामे कशी चांगल्या प्रकारे आणि उत्तम दर्जाची होतील याचा विचार करून विकासाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असते. परंतु बऱ्याचदा “लागीची होकाल कूरडी” या म्हणी प्रमाणे स्थानिक अधिकाऱ्यांनाच नाहक त्रास दिले जातात आणि त्यांच्या बदल्या करण्यास लोकप्रतिनिधी किंवा समाजसेवक म्हणावणारेच लोक कारणीभूत ठरतात. स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणारे, दाढ्या वाढवून राजे म्हणवणारे, “नीचतम” काम करणारे काही लोक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सतत काही ना काही कारणांसाठी भेटून त्रास देतात. यामुळे बरेचसे अधिकारी कामाच्या ताणापेक्षा अशाप्रकारे त्रास देणाऱ्या तथाकथित समाजसेवकांनाच विटतात आणि पर्यायी मार्ग म्हणून बदली स्विकारतात.

क्रमशः

 

प्रतिक्रिया व्यक्त करा