*सिध्दहस्त लेखिका, कवयित्री, उत्तम सूत्र संचालक, निवेदिका वर्षा बालगोपाल (स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुतणी) यांनी पिंपरी चिंचवडच्या साहित्यिका-माधुरी वैद्य डिसोजा यांवर लिहिलेला लेख*
आपल्या शहरातील एक सर्वात प्रसिद्ध व्यक्ती••• सर्वात प्रसिद्ध अशासाठी की रोज कमीत कमी तीन-चार कविता वेगवेगळ्या मासिकात वृत्तपत्रात प्रकाशित होतात••• अशी व्यक्ती •••बरोबर! बाबूजी डिसोजा सर••• यांना जसे आपण ओळखतो••• तसेच त्यांच्याबरोबर सर्व साहित्य कार्यक्रमात हजर असणाऱ्या••• त्यांची सावली सारखी सोबत करणाऱ्या••• त्यांच्या सहचारीणी माधुरी डिसोजा यांची कहाणी•••
साहित्यिकाचा जोडीदार साहित्यिक असणाऱ्या काही निवडक जोडी पैकी बाबूजी डिसोझा आणि माधुरी डिसोझा ही जोडी •••
त्यातील माधुरी डिसोजा यांचा जन्म वैद्य कुटुंबीया पोटी —- रोजी माढा येथे झाला. शालेय शिक्षण दौंड येथे झाले .वडील दौंड येथेच रेल्वेमध्ये सीनियर क्लार्क म्हणून कार्यरत होते.
आई संधिवाताने आजारी होती तेव्हा भाऊ हेमंत अवघ्या सहा महिन्याचा होता . त्याला सांभाळत त्यांनी शालेय शिक्षण घेतले .
पुढे त्यांनी पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले .सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र निवडले . समाजातील अशिक्षित लोकांना समजून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करण्यात त्यांना आनंद मिळत होता.
लहानपणीच आईची वाचनाची आवड ,आजीचे संस्कार, यामुळे त्यांना साहित्याची गोडी लागली .
या गोडीची जोडी मनात ठेवूनच त्यांनी रेल्वे हॉस्पिटल, केईएम मध्ये नोकरी करत असताना, डॉक्टर बानू कोयाजी बरोबर काम करण्याची संधी मिळाली••• आणि रेल्वेने जाऊन येऊन करताना बाबू डिसोझा यांची ओळख झाली .
या ओळखीचे रूपांतर तीन जून 1982 रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने श्रीकृष्ण मंदिरात विवाहबद्ध होण्यात झाले .बापूजी सवे रममाण होताना, नोकरी, धावपळ ,संसार ,लिखाण, सर्व आनंदाने बहरत होते. त्यांच्या साहित्यात सुधारणा बाबूजी सुचवत होते.
बाबूजींची फिरतीची नोकरी••• आणि मुलांचे शिक्षण••• व स्वतःची नोकरी •••हे सगळे साध्य कसे करणार ? मग यातून सुवर्ण मध्य साधत••• मुलांच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या नोकरीसाठी त्या पुण्यात स्थायिक राहिल्या •••आणि बाबूजींना आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी त्या भेटायला जात असत . अशी तारेवरची कसरत करत••• घर ,मुले ,नोकरी, नातेवाईक ,हे सगळे सर्वार्थाने सांभाळत ,अतिशय कुशलतेने त्यांनी मुलांचे संगोपन केले. त्याचा परिणाम म्हणून आज दोन्ही मुले डॉक्टर आहेत.
हे सगळे सांभाळताना त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा तेव्हा जीवनानुभव त्या लिहून ठेवत असत . चांगल्या, कडू, गोड ,वाईट अशा अनेक अनुभवांचे संग्रहण नकळत घडत गेले .
परंतु अतिशय सकारात्मक विचारसरणी असलेल्या माधुरी यांनी, वाईट अनुभव विसरण्यासाठी केवळ चांगल्या प्रसंगाची आठवणमाला पुस्तक रूपाने ‘चिरंजीव आठवण’ म्हणून प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. ही कल्पना बाबूजी आणि इतर कुटुंबीयांनी उचलून धरली; आणि त्यांचा पहिला आत्मकथा संग्रह •••एक झुंज प्रकाशित झाला .
*एक झुंज*
हा आत्मकथा संग्रह ललित प्रकाशनच्या प्रियांका पाटील यांनी 28 फेब्रुवारी 2021 रोजी प्रकाशित केला असून त्याचे मूल्य अवघे 100 रुपये आहे.
हा संग्रह माधुरी यांनी स्वतःचा परिवार नातेवाईक मैत्रिणी आणि सहकारी यांना समर्पित केला आहे .
पुस्तकाची प्रस्तावना श्री ललित कोलते यांनी केली आहे .याच्या मध्ये त्यांनी आत्मकथा एक स्वतंत्र कला प्रकार आहे असे सांगून न्यायमूर्ती रानडे नामदार गोखले लोकमान्य टिळक महात्मा गांधी दलितोद्धारक आंबेडकर क्रांतिकारक सावरकर धर्मसंजीवक विवेकानंद या आणि इतर अनेक चरित्रांचा दाखला दिला आहे.
तसेच रमाबाई रानडे कमलाबाई देशपांडे बाया कर्वे (महर्षी कर्वे यांच्या पत्नी )इंदिरा भागवत सरोजिनी सारंगपाणी या स्त्रियांच्या चरित्र ग्रंथाचाही यथोचित दाखला दिला आहे.
त्याचप्रमाणे माधुरी यांनी केलेले जीवनातील प्रसंगाचे रोखठोक वर्णन •••प्रांजल वृत्तीने केलेले लीखाण तर भावनातील उत्कटता अनेक मार्गाने प्रकट करून हा ग्रंथ साकारला आहे असे म्हणतात .
या कथा आयुष्याला शिकवण देणाऱ्या ,समाजाला संदेश देणाऱ्या ,सर्व परिस्थितीचा खंबीरपणे सामना करायला शिकवणाऱ्या ,आहेत हे सांगितले आहे .
तसेच जी व्यक्ती धाडसी असते अनेक प्रसंग पचवण्याची ताकद ठेवते तीच व्यक्ती आत्मकथा लिहू शकते या शब्दात माधुरी यांचे कौतुक केले आहे .
या संग्रहाला हेमंत वैद्य, दीपक वैद्य, बाबू डिसोझा यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत .
तर मनोगतात माधुरी म्हणतात प्रपंचा नंतर लेखन प्रपंच केला तरी डायरी पुरता मर्यादित असलेला हा प्रपंच लोकाभिमुख होण्यासाठी साप्ताहिक शितल टाइम्स सायंकाळी दैनिक रामनगरी आपलं व्यासपीठ न्यूज यातून प्रसिद्धी मिळाली. तरी एकत्रीत प्रकाशन होण्यासाठी पिंपरी चिंचवडचे अनेक साहित्यिकांचे प्रोत्साहन मिळाले आणि त्याचे फलित रूप म्हणजे हा लेख संग्रह .
या पुस्तकात आपल्या विवाहापूर्वीचे काही अनुभव विवाह नंतरचे सुवर्ण दिवस आणि विवाह नंतरचे काही प्रसंग वेगवेगळ्या 24 कथा रुपात शब्दांकित केले आहेत .
चमत्कार कथेत आपल्या मैत्रिणीची कथा सांगितली आहे.
तर अनुभव कथेत दिवाळी अंकात छापण्यासाठी दिलेल्या प्रकाशकाकडून कथा गहाळ झाल्याने छापून आल्या नाही पण केलेले लिखाण एक प्रतीचेच होते म्हणून ते लिखाण देवार्पण समजून नव्या जोमाने लिखाण करण्याचा निर्णय हा अनुभव कथन केला आहे .
मदत कथेत तारा मावशी नावाच्या आदिवासी पाड्यातील महिलेला ऑपरेशन स्वस्तात करून देण्यासाठी प्रसंगी स्वतःचे रक्त देऊन जेवण करण्याची पथ्याची काळजी घेऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतरही केलेली मदत वर्णन केली आहे .
*त्यांच्या याच आत्मकथेसाठी एका कातकरी स्त्रीला स्वतःचे रक्त लोकमान्य रक्तपेढीला देऊन दोन बाटल्या रक्त मिळवले म्हणून माधुरी यांना खोपोली नगरपरिषदेने २६ जानेवारी १९९६ रोजी समारंभ पूर्वक सन्मान करून श्रेष्ठता प्रमाणपत्र प्रदान केले. तसेच सेवाभावी परिचारिका म्हणून रोटरी क्लब ने रायगडच्या भूषण म्हणून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.*
*नवयुग साहित्य शिक्षण मंडळ यांनी रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्यांना प्रेरणा पुरस्कार प्रदान केला*
क्षण कथे कविता वाचनाची संधी मिळाल्याचा क्षण शब्दांकित केला आहे .
जिद्द कथेत मैत्रीण सविताच्या जिद्दीची कथा लिहिली आहे.
अशा प्रकारे इच्छापूर्ती ,त्याग, नात ,देव माणूस ,बीज, जिद्द ,एक झुंज, भेट ,एक असाही अनुभव, आमची सहल ,अमूल्य उपक्रम, अपमान ,गुरू ,कौतुक, बक्षीस समारंभ, श्रद्धा ,संगीताची आवड, सेवेचा श्री गणेशा, आमचे कोकण, अशा शीर्षकाखाली अतिशय उत्सुकतावर्धक लिखाण केले आहे.
यामध्ये एक झुंज हे कोविड काळातील बाबूजी यांचे डायलिसिस चालू असताना कोविडशी खंबीरपणे दिलेली झुंज त्यावेळची त्यांची मनस्थिती इत्यादी ओघळत्या भाषेत लिहिले आहे .हे वाचताना अश्रू आपोआपच येतात.
अशा छान ह्रदयस्पर्शी लिखाणातून एक झुंज साकार झालेले आहे .
मग जरा खोल विचार केला आणि वाटले वर्षातील 24 पंधरवडे •••नव्हे नव्हे दिवसातील 24 तास••• सतर्क राहून उत्कट प्रसंग शब्दचित्रित करताना •••अशोक चक्रातील 24 आर्यांची गती प्राप्त होऊन •••24 आऱ्यांची श्रेष्ठता••• अंगी लेऊन •••24 कॅरेट मनाचे •••अतिसुंदर प्रकटन म्हणजे हे 24 प्रकरणाचे लिखाण होय •••किंवा न्यूमरॉलॉजी म्हणजेच अंकशास्त्राच्या दृष्टीनेही शांती सुसंवाद आणि सुबत्ता यांचे प्रतीक म्हणजे 24 अंक मानला जातो •••ते सर्व आपोआपच एक झुंज या आत्मकथनात आले आहे••• म्हणून 24 प्रकरणे आली असावी•••
या कथा इतक्या बोलक्या आहेत कि याचे वाचन करावे इतरांना सांगावे असे वाटत रहाते. म्हणूनच एक उत्कृष्ट अभिवाचक आपल्या समूह सदस्या ज्यांनी दत्ता गुरव यांचे सदर अभिवाचनाने गाजवले त्या उज्ज्वला केळकर यांनी एका कथेचे अभिवाचन केले आहे.
असे सुंदर लिखाण करणाऱ्या सौभाग्यवती माधुरी यांना पुढील कार्यास लिखाणासाठी शुभेच्छा देते •••त्यांच्यामधील कथालेखिकेस उत्तम कथाकार होवो अशी प्रार्थना करते••• आणि असेच हृदयस्पर्शी मनस्पर्शी लिखाण पुढेही वाचावयास मिळेल ही आशा करते •••तसेच आपण सर्वच जण हा संग्रह आपल्या ग्रंथालयात दाखल कराल हा विश्वास बाळगते•••
वर्षा बालगोपाल
शाहूनगर, चिंचवड, पुणे-४११०३३