संजू परब विरोधी गट नितेश राणे यांच्या संपर्कात
सावंतवाडी शहरातील भाजपमध्ये असलेल्या एकजुटीच्या जोरावर मागील निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेवर जवळपास २३ वर्षे असलेली ना. दीपक केसरकर यांची सत्ता उलथवून टाकण्यास भाजपला यश आले होते. माजी नगराध्यक्ष संजू परब सारखा युवा चेहरा ना.दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीकरांनी पसंत केला आणि सावंतवाडी नगरपरिषदेवर संजू परब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती.
सत्तेत असताना असलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची एकजूट सत्ता स्थापनेनंतर हळूहळू तुटलेली दिसून आली. भाजपा नगरसेवकांमधील हुशार म्हणून ओळखले जाणारे माजी बांधकाम सभापती विधीतज्ञ परिमल नाईक हे संजू परब यांच्यापासून दूर गेल्याचे चित्र नजरेत येऊ लागले होते. त्यानंतर भाजपाचे दुसरे बांधकाम सभापती, उदय नाईक आदी नगरसेवक आ.नितेश राणे यांच्या जवळ आणि संजू परब यांच्यापासून दूर असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे सावंतवाडी शहर भाजपा मध्ये सुंदोपसुंदी असल्याचे जाहीर झाले. एकेकाळी संजू परब पत्रकार परिषद घेताना त्यांच्यासोबत शहर मंडळ अध्यक्ष गोंदावळे, चेतन आजगावकर, बंटी पुरोहित असे अनेकजण उपस्थित असायचे. त्यामुळे संजू परब हे वजनदार लोक्रतिनिधीं असल्याचे दिसून येत होते. परंतु भाजपा मध्ये पडलेल्या दुफळीमुळे ना.केसरकर यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना संजू परब हे दिलीप भालेकर यांना सोबत घेऊन केसरकरांवर टीका करताना दिसून आले. वास्तविक भाजपाचे प्रवक्ते म्हणून बोलताना त्यांच्या सोबत कोण आहेत हे सुद्धा महत्त्वाचे आहे, परंतु गेल्या काही काळापासून संजू परब हे एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे.
संजू परब यांनी आपण पुढील विधानसभा लढविण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले आहे परंतु सावंतवाडी शहर भाजपमध्ये पडलेले फूट पाहता संजू परब यांना सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. त्याचबरोबर संजू परब यांच्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागेल हे मात्र नक्कीच. संजू परब हे प्रत्येकवेळी बोलताना आपण राणे यांच्या घरातीलच सदस्य असल्याचे म्हणतात,त्यामुळे संजू परब यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांना देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा युती असल्यामुळे भविष्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कोणाकडे जातो हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. अशाही परिस्थितीत युती न होता एकाच एक लढत झाल्यास आणि संजू परब यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास भाजपमध्ये पडलेली फुट त्यांच्या साठी काम करेल की तटस्थ राहील हे देखील येणारा काळच ठरवणार.