कुडाळ
“मनाच्या निरोगी आयुष्यासाठी शरीरही निरोगी असले पाहिजे. यासाठी शालेय जीवनापासून खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे; तरच आपलं शरीर तंदुस्त राहतं .याच्यातूनच एखादा राज्य, देशपातळीवरचा खेळाडू तयार होऊ शकतो …आणि याची सुरुवात शालेय स्तरावरच्या ,महाविद्यालयीन स्तरावरच्या अशा क्रीडा महोत्सवातूनच होत असते . याची जाणीव ठेवून खेळाकडे सकारात्मक नजरेने पहा.” असा संदेश बॅ .नाथ पै बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे यांनी दिला. ते कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य व विज्ञान महिला आणि रात्र महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
” खिलाडू वृत्तीने या खेळाकडे पहा आणि त्यातून आपल्या शारीरिक क्षमता आजमावा. निरोगी आयुष्यासाठी खेळ हा आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. व त्याचा मनमुराद आनंद लुटा “असे सांगून सर्वांना या क्रीडा महोत्सवात भाग घेतलेल्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज बेस्ट नाथ जुनिअर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या उपप्राचार्य विभा वझे ,ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख मंदार जोशी महिला व रात्र महाविद्यालयाच्या जिमखाना प्रमुख प्रांजना पारकर, प्रा दिपाली वाळके, क्रीडा मार्गदर्शक विक्रम सिंह ,प्रसाद कानडे ,पूजा मेस्त्री, रोहिणी नाईक इत्यादी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रा. अरुण मर्गज यांनी प्रयत्न करत रहा .खेळातला आनंद घ्या. निरस व धकाधकीच्या जीवनातून क्षणभर बाहेर पडण्यासाठी खेळ हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात सहभागी व्हा. आनंद लुटा. स्वतःतील कला- कौशल्यांचा शोध घ्या. संघ भावना वृद्धिंगत करा “.असा संदेश देऊन क्रीडा महोत्सवात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अर्जुन सातोस्कर यांनी सुद्धा “खेळ हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा. त्यातूनच तुमच्यातील एखादा कलावंत घडेल .निरोगी नागरिक बनेल आणि आपल्याबरोबर आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे, जिल्ह्याचे नाव रोशन करू शकेल. जय पराजय खिलाडू वृत्तीने स्वीकारा.” असा संदेश देत क्रीडा स्पर्धेसाठी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा मेस्त्री हिने तर सूत्रसंचालन मंदार जोशी व रोहिणी नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.