मुंबई
आज या मंडळाचे १२ वे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होत असताना त्यांची उभारणी करताना ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्यांच्या सहकार्यामुळे स्नेह वृद्धिंगत होतो आहे. म्हणूनच गावचे प्रश्न संघटीतपणे सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करुया ! तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे संस्थापक धर्माजी बाबू पराडकर यांनी भांडुपच्या गीता सभागृहात आयोजित स्नेहसमलेन समारंभात विद्यार्थी, ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सतिश कोयंडे, उपाध्यक्ष अजित पराडकर, कार्याध्यक्ष जितेंद्र धनंजय मुणगेकर, सरचिटणीस सतिश पराडकर आदींच्या हस्ते श्री गणेश व सरस्वती पूजन करण्यात आले. तर भजनी बुवा गुणाजी पोसम यांनी सुरेल आवाजात स्वागतगीत सादर करून प्रारंभ करण्यात आला. संस्थापक पराडकर पुढे म्हणाले सलग दोन वर्षे आम्हाला कार्यक्रम घेता आला नाही. आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्नशील होता. म्हणून आज विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबर सेवानिवृत्त ग्रामस्थांचा गौरव करण्याचे ठरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सतिश कोयंडे यांनी एक तप आपण स्नेह संमेलन साजरे करीत आहोत. आता तरुण पिढीने पुढे येऊन हा वारसा जपणे गरजेचे आहे असे सूतोवाच केले. उपाध्यक्ष अजित पराडकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेताना विविध योजना राबविण्याचा विचार असल्याचे सांगितले. याप्रसंगी गुणवत्त विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक प्रदान करून तर सेवानिवृत्तांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पत्नीचा सौभाग्याचे लेणे देऊन सन्मान करण्यात आला. यात सहभागी झालेल्या समाजाचे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, दर्यावर्दी मासिकाचे संपादक अमोल सरताडेल यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारादाखल कांदळगावकर, सरतांडेल यांनी आनंदवाडीतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुलांनी सादर केलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ, सल्लागार यांनी परिश्रम घेतले. आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर एकमेकांचा निरोप घेतला. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पराडकर यांनी केले.