You are currently viewing प्रजासत्ताक दिनी प्रसाद गावडे करणार आत्मक्लेश आंदोलन 

प्रजासत्ताक दिनी प्रसाद गावडे करणार आत्मक्लेश आंदोलन 

कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची अवस्था बिकट; कंत्राटी कर्मचारी चार महिन्यांपासून पगारविना!

कुडाळ

मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने महिला व बाल रुग्णालयाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असून ह्यात जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रसंगी प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गनगरी येथे “आत्मक्लेश” आंदोलन करणार असल्याचे मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

कोट्यवधीं रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय समस्यांनी ग्रासले आहे. मागील आठवड्यात रुग्णालयात चक्क दोन दिवस पाणी नाही म्हणून रुग्णांना परतवण्याची वेळ रुग्णालय व्यवस्थापनावर येणे यासारखे दुर्दैव नाही.अशा प्रतिकूल परिस्थितीत रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार मागील चार महिन्यांपासून थकीत असल्याने कर्मचारी देखील नैराश्यात वावरत आहेत.

याआधी रुग्णालयीन कंत्राटी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होऊन उमेदवारांची आर्थिक पिळवणूक केल्याचे आरोप झाले होते. तर आता त्याच कर्मचाऱ्यांवर पगाराअभावी उपासमारीची वेळ येणे ही सार्वजनिक आरोग्य विभागाची नाचक्की म्हणावी लागेल.एकूणच रुग्णालय व्यवस्थापनातील सावळ्या गोंधळामुळे सामान्य जनतेला आरोग्य सुविधा मिळण्यापेक्षा कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून अधिक वेदना असल्याचे मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा