सिंधुदुर्गनगरी येथे देशातील १६ व्या राष्ट्रीय एससी, एसटी हब शाखेचे झाले उद्घाटन
ओरोस
देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग मधील नागरिकांमध्ये उद्योजकता संस्कृती जागृत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एससी, एसटी हब २०१६ पासून सुरू केले आहे. त्याची देशातील १६ वी शाखा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माझ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केली जात आहे. देशातील अनेक राज्यात एकही याची शाखा सुरू झालेली नसताना मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस सी आणि एस टी प्रवर्गातील नागरिकांसाठी वेगळी शाखा सुरू केली आहे. त्याचा लाभ या प्रवर्गातील नागरिकांनी घेवून नोकरी शोधण्या ऐवजी उद्योजक बनून नोकरी प्रदाता बनावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथील नवनगर विकास प्राधिकरण मधील रवळनाथ अपार्टमेंट येथे केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते खास सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राष्ट्रीय एससी एसटी हब शाखा कार्यालयाचा शुभारंभ झाला. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती योजनेचे प्रमुख गौरंग दीक्षित, जनरल मॅनेजर मनोज कुमार, रवी कुमार, सिंधुदुर्ग शाखा प्रबंधक तारेश घोरमोडे, राष्ट्रीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती योजनेच्या उच्चस्तरीय समितीचे सदस्य तथा सिंधुदुर्ग सुपुत्र विजय केनवडेकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, ओरोस बुद्रुक सरपंच आशा मुरमुरे, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, संतोष वालावलकर, ओरोस सदस्य पांडू मालवणकर, निता जुवेकर, शमिका सावंत, गौरी बोंद्रे, राजश्री नाईक, पूजा मालवणकर, मिताली राऊळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि एस सी एस टी हब विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.