सावंतवाडी
कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणार्या घंटा गाड्यांना आता सावंतवाडी पालिका बाय-बाय करणार आहे. त्या ठीकाणी आता ई-रिक्षा दिसणार असून लवकरच त्या वापरात आणण्यात येणार आहेत. आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या साडे अठरा लाखाच्या निधीतून हया गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या उपक्रमामुळे पालिकेचा मोठा इंधनखर्च वाचणार असून मनुष्यबळ देखील कमी लागेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
या गाड्या खरेदी करण्यासाठी आमदार निधीतून साडे अठरा लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यातूनच या सहा गाड्या खरेदी करण्यात आल्या. घंटागाडीला पर्याय म्हणून त्यांचा येणाऱ्या काळात वापर होणार आहे. दोन दिवसांपूर्वी या गाड्या सावंतवाडीत दाखल झाल्या आहेत. या गाड्यांचा वापर शहरातील कचरा गोळा करण्यासाठी झाल्यानंतर इंधनासोबतच मनुष्यबळ सुद्धा कमी लागणार आहे. त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी पालिकेचा होणारा बराचसा खर्च कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. तर घंटागाडी मधून कचरा गोळा करण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेता विजेवर धावणाऱ्या कचरा गाड्यांमुळे कचरा गोळा करण्याची प्रक्रिया सुद्धा जलद गतीने होईल, त्यामुळे नागरिकांना कचरा जास्त वेळ साठून राहिल्याने करावा लागणारा दुर्गंधीचा सामना सुद्धा कमी होणार आहे. या गाड्यांचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून जलद गतीने या गाड्या नागरिकांच्या सेवेत येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.