पुढील १० दिवसात या रस्त्याचे काम सुरु न झाल्यास..ठेकेदार दत्ता सामंत यांना मालवण – बेळणा रस्त्यावरून फिरू देणार नाही – युवराज मेस्त्री
मालवण :
मालवण- बेळणा रस्ता प्रजिमा ३२ या रस्त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेना महाविकास आघाडी सरकारच्या काळात २ कोटी ४७ लाख १६ हजार एवढा निधी मंजूर केला आहे. सदर कामाला २५ ऑगस्ट २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला. काम पूर्ण करण्याचा कालावधी १२ महिने होता परंतु मुदत संपून ४ महिने झाले तरी ठेकेदाराने रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही.
सदर रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे अनेक अपघात झाले आहेत. नागरिकांच्या गाडयांचेही नुकसान होत आहे. शिवसेना- युवासेनेच्या वतीने रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सोमवार २६ डिसेंबर २०२२ पासून नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.
सदर नागरिकांच्या सह्यांचे पत्र मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना देण्यात येणार असून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील करण्यात येणार आहे.
तरी देखील पुढील १० दिवसात या रस्त्याचे काम सुरु न झाल्यास ०५ जानेवारी २०२३ रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसेच दत्ता सामंत यांना मालवण बेळणा रस्त्यावरून फिरू देणार नाही असा इशारा युवासेना आडवली मालडी विभाग प्रमुख युवराज मेस्त्री यांनी दिला आहे.