नगरसेवक सुशांत नाईक यांची ल.पा. विभागाकडे मागणी
कणकवली
कणकवली शहरात असणाऱ्या गडनदी वरील कनकनगर व मराठा मंडळ जवळील केटी बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट बसवून नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी आडवा अशी मागणी विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. याबाबत लघुपाटबंधारे विभागाला निवेदन देखील देण्यात येणार असल्याची माहिती विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी दिली.
कणकवली शहरातील गडनदी वरील कनकनगर व मराठा मंडळ जवळील केटी बंधाऱ्यांमध्ये प्लेट टाकून पाणी अडवल्यास त्याचा फायदा हा कणकवली शहरातील जलस्त्रोतांना होत असतो. यावर्षी डिसेंबर महिना अर्धा संपत आला तरी अद्याप ही प्लेट लावलेल्या नसल्याने हे पाणी वाहून जात आहे. या मुळे शहरातील जल स्त्रोतांची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे कणकवली शहराला भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये या दृष्टीने आतापासूनच या दोन्ही बंधाऱ्यांचा लोखंडी प्लेट लावाव्यात अशी मागणी नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी आदींनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली असल्याची माहिती सुशांत नाईक यांनी दिली.