सिंधुदुर्गनगरी
आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी असेल तर, येणाऱ्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यास मदत होते. त्यामुळे प्रशिक्षण आवश्यक असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आज उद्घाटन झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षण, संस्कार जीवनात दीर्घकाळ टिकतात. शिक्षकांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे योग्य धडे विद्यार्थ्यांना देण्यास उत्तम मदत होते. जीवनात पुढे त्याचा फायदा होतो. त्यासाठीच आज या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या जिल्हा प्रशासनाच्या कार्यात शिक्षकांचा फार मोठा हातभार लावला जात असतो.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड म्हणाले, शालेय शिक्षणात शिक्षकांकडून विद्यार्थितील मिळालेल्या शिक्षणाचा फायदा पर्यटकांचा जीव वाचवून गेला. विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिक्षणाचा, प्रशिक्षणाचा खूप मोठा सकारात्मक परिणाम होत असल्याने आजच्या प्रशिक्षणाचे महत्व आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी ‘यशदा’ चे प्रशिक्षक राहूल पोखरकर आणि विवेक नायडू उपस्थित होते. प्राचार्य अनुपमा तावशीकर यांनी प्रास्ताविक करुन प्रशिक्षणामागील उद्देश स्पष्ट केला. कार्याक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन वर्षा बनसोडे यांनी केले, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी सर्वाचे आभार मानले.