*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रीतगंध*
*(अष्टाक्षरी)*
प्रीत फुलांचा वर्षाव
सर्व तनुवर व्हावा
सुवासिक प्रीतगंध
अंतरंगी पसरावा
ओढा आपुलकीचा हा
खळाळत घेई धाव
आस मनीच्या स्वप्नांची
हृदयास नाही ठाव
भावनांचा हिमनग
नयनांनी पारखावा
दुःखाश्रूंचा महापूर
पापण्यात ओसरावा
गोड रस प्रीतीतला
अधरांनी मुक्त प्यावा
हळुवार स्पर्शातूनी
मिठीमध्ये लुप्त व्हावा
क्षण क्षण आनंदाचा
ओंजळीत झेल घ्यावा
अनमोल रत्नासम
हृदयात साठवावा
हास्य रुपी गोड फळे
पक्व व्हावी अंतर्मनी
प्रीतीतल्या लहरींनी
येते मनी संजीवनी
*✒️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*