*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार डॉ.शिवाजी काळे लिखित अप्रतिम गझल*
आयुष्य एखाद्या अनाकलनीय चित्रासारखे आहे
काही कळत नसले तरी थांबून बघण्यासारखे आहे
कित्येकजण डोकावले पण आत कोणी थांबले नाही
माझे हृदय रस्त्यातल्या शापीत वाड्यासारखे आहे
कोणी दबा धरलाय त्यांना माहिती नाही असे नाही
या पाखरांचे वागणे चाहूल नसल्यासारखे आहे
पानाफुलांचे स्वप्न पाहू शक्यता निर्माण झाल्यावर
माझ्यामधे टिकणे तुझे वाळूत रुजण्यासारखे आहे
हे जग जवळ आले म्हणावे तर तसे वाटत कसे नाही
एकत्र फिरणाऱ्यांत अंतर चंद्र सूर्यासारखे आहे
माझ्याकडे जर यायचे आहेच तर या घाटरस्त्याने
( हे भेटण्याआधी जरा अंदाज घेण्यासारखे आहे )
केंद्रात वा परिघातही ज्याच्या शिवा सामावला नाही
त्या वर्तुळाला आपले म्हणणे दिखाव्यासारखे आहे
डॉ. शिवाजी काळे