You are currently viewing तेंडोलीत शेतविहीरीत कोसळलेल्या गव्याच्या पिल्लाला वनविभागाकडून वाचविण्यास यश

तेंडोलीत शेतविहीरीत कोसळलेल्या गव्याच्या पिल्लाला वनविभागाकडून वाचविण्यास यश

कुडाळ

तेंडोली-तळेवाडी येथील शेत विहिरीत रान गव्याचे पिल्लू कोसळले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तब्बल अडीच तास मदतकार्य करून त्या पिल्लाला बाहेर काढण्यास यश आले. तेथील शेतकरी शांताराम तेली यांच्या शेत विहिरीत ते कोसळले होते. ही घटना आज सकाळी ११ वाजता घडली. याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विहिर परिसरात माड व काजूबागायती क्षेत्र असलेने घटनास्थळी जेसीबी मशीन अथवा क्रेन घेऊन जाणे अशक्य होते. वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल झालेनंतर सदर १५-२० फूट खोल विहिरीमध्ये वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट यांनी शिडी व दोर याच्या साहाय्याने उतरून त्या पिल्लाच्या अंगाभोवती पट्टा गुंडाळल्यानंतर रेस्क्यू पथकातील अन्य सदस्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यास दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढल्यांनंतर त्या पिल्लाने आपल्या अधिवासात धूम ठोकताच वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.

सदर वन्यप्राणी रानगव्याचे पिल्लू (मादी) जातीचे १-२ वर्षे वयाचे असून त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट करणेत आलेले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच माहिती दिल्याने त्याचा जीव वाचवता आलेने स्थानिक ग्रामस्थांचे आभार वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तथा सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी श्री. अमृत शिंदे यांनी सांगितले.

सदर कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री .एस एन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तथा सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी, धुळु कोळेकर वनपाल नेरूर त हवेली, श्रीकृष्ण परीट वनपाल मालवण, सावळा कांबळे वनपाल मठ, संजीव जाधव वनरक्षक कुडाळ, वनमजूर कदम, वाईल्ड लाईफ रेस्क्यू इमर्जन्सी संस्थेचे अनिल गावडे, वैभव अमृस्कर, सिद्धेश ठाकूर, स्थानिक ग्रामस्थ नितीन वेंगुर्लेकर, अण्णा तेली, आबा भोगले व पोलीस पाटील तेंडोली श्री नाईक यांनी यशस्वी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा