माजी मुख्यमंत्री व भाजपाचे खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्याकडून अखेर बंडू हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
नगराध्यक्ष समीर नलावडे यांचेही निकटवर्तीय अशी हर्णे यांची ओळख
कणकवली
कणकवली उपनगराध्यक्षपदी कणकवली नगरपंचायत चे ‘ब्रेन’ समजले जाणारे गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी सप्टेंबर मध्ये राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. मात्र या पदावर कुणाची वर्णी लागणार हा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या कोर्टात होता.
बंडू हर्णे हे गेली काही वर्षे कणकवली नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असताना अनेकदा त्यांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिलेली होती. तरीही ते नगरपंचायत मध्ये सक्रिय राहिले होते. नगरपंचायत वर आरोप झाले की त्याचे खुबीने उत्तर देण्यासाठी बंडू हर्णे पुढे यायचे. विरोधकांनी केलेला वार पलटविण्यात त्यांचा हातखंडा आहे. दोन वर्षांपूर्वीच्या नगरपंचायत निवडणुकीतही हर्णे यांचा अवघ्या २ मताने निसटता विजय झाला होता. त्यामुळे हर्णे यांना पहिल्या टर्ममध्ये उपनगराध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता होती. पण अचानक नारायण राणेंकडून वापरलेल्या धक्का तंत्रामुळे या पदावर रवींद्र गायकवाड यांची निवड झाली होती. या पार्श्वभूमीवर या निवडीवेळी नारायण राणे यावेळी धक्कातंत्र वापरणार की हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कणकवली नगरपंचायत च्या प्रशासकीय कामकाजाचा अभ्यास व कणकवली शहराचे राजकारण कोळून प्यायलेले मुत्सद्दी राजकारणी अशी बंडू हर्णे यांची ओळख आहे. कट्टर राणे समर्थक सोबतच नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे निकटवर्तीय अशी हर्णे यांची ओळख असल्याने यावेळी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले असतानाच नारायण राणे व नितेश राणे यांच्याकडून अखेर हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.