You are currently viewing मडुरा तिठ्यावरील डॉ. शंकर नाईक यांचे निधन

मडुरा तिठ्यावरील डॉ. शंकर नाईक यांचे निधन

बांदा

शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रासह जनतेची सेवा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकत अखेर पर्यंत वैद्यकीय सेवा बजावणारे मडुरा तिठ्यावरील अर्धांगवायू तज्ञ डॉ. शंकर आत्माराम नाईक (वय 83) यांचे राहत्या घरी निधन झाले.

डॉ. शंकर नाईक यांनी रोणापाल गावच्या उपसरपंच पदाची धुरा सांभाळत गावाच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. मडुरा न्यु इंग्लिश स्कुल कमिटीचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. एवढ्यावरच न थांबता धार्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. मडुरा मारुती मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. शैक्षणिक क्षेत्रात मडुरा पंचक्रोशीत मोठा वाटा होता. दरवर्षी गणवेश वाटप, वह्या वाटप तसेच देणगी स्वरूपात अनेक शाळांना त्यांनी मदतीचा हात दिला.
कन्नूर-विजापूर येथील श्री समर्थ गणपतराव महाराज संस्थेला त्यांनी कायम ठेव म्हणून ठराविक रक्कम देत सहकार्य केले. लहान मुले विद्यार्थी दशेतच संस्कारी व्हावीत म्हणून ते नेहमी सत्संगला प्राधान्य देत. डॉ. नाईक यांची ओळख केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच मर्यादित न राहता मुंबई, गोवा, विजापूर, कर्नाटक, गडहिंग्लज भागातून आरोग्य तपासणीसाठी रुग्ण यायचे. डॉ. नाईक यांच्या अकाली जाण्याने रोणापाल गावासह मडुरा पंचक्रोशीत शोकांतिका पसरली आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आमदार वैभव नाईक तसेच शैक्षणिक, क्रीडा, राजकीय, सामाजिक, नाट्य क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती लावली.

गोवा-उगवे येथील डॉ. अमित नाईक, मडुरा राजश्री मेडिकलचे सुनिल नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल संघटनेचे उपाध्यक्ष तथा रेडी भागीरथी मेडिकलचे विद्याधर नाईक यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा