You are currently viewing सुंदर…..

सुंदर…..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

* सुंदर…..*

आता सकाळी सकाळी स्वप्न मला हो पडले
माझ्या भांगा भांगातुनी कळ्या मोती लघडले
आम्रतरू मोहरले कोकिळची आली साद
किणकिणल्या घंटा नि देवळात तो निनाद….

कोंबड्याने दिली बांग झाडावर ताठरला
फडफडल्या कोंबड्या घरधनी हा उठला
सडा सारवण झाले सजे अंगणी रांगोळी
लगबग लगबग उरकल्या त्या आंघोळी…

वेली बहरून आल्या फुले सांडली अंगणी
मधुमालती कोरांटी ओसांडली ती चांदणी
देवपुजा बहरली घमघमले चंदन
झाले साजिरे गोजिरे घर मंदिर अंगण…..

प्रसन्नता भारली ती मन आनंदे नाचले
रथ आदित्याचा येता आधी किरण धावले
वायुवेगे धुक्यातून ढगातून नारायण
चराचर फुलारले सृष्टीचा तो कणकण …

चैतन्याचा तो बहरू जीवन ते कल्पतरू
असे वाटते मनाला किती सजवू सावरू
भरूनच घ्या हो घडा पेला अमृताचा रोज
नका बनू गंगू तेली बना बना राजा भोज….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १८ डिसेंबर २०२२
वेळ : दुपारी ३ वाजता.

प्रतिक्रिया व्यक्त करा