एकांकिका महोत्सव उत्साहात साजरा
प्राधिकरण-(प्रतिनिधी)
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात तीन एकांकिकांचा महोत्सव घेण्यात आला.
सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा चांदबी सय्यद आणि एकांकिकेच्या कलाकारांच्या हस्ते,नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन झाले .
सौ अर्चना वर्टीकर लिखित आणि मंगेश वर्टीकर दिग्दर्शित ” हॅलो आबा ” या एकांकिकेचे सादरीकरण झाले . ज्येष्ठांच्या जीवनातील घटनांची अतिशय खुसखुशीत मांडणी या एकांकिकेत केली होती.
यात सुरेश गुळवे, भगवान महाजन, नरेंद्र मिसाळ, समिता टिल्लू, सुनिता येन्नुवार, रमा सरदेसाई या कलाकारांनी भाग घेतला होता.
दुसरी एकांकिका होती.. ” रंग मावळतीचे ” आनंदी ज्येष्ठत्व हा विषय असलेली ही एकांकिका सौ ज्योती कानेटकर यांनी लिहिली होती आणि अशोक अडावदकर यांनी दिग्दर्शन केले होते . यात चंद्रशेखर जोशी,अनुराधा पेंडुरकर, अलका भालेकर,प्रियांका आचार्य,सतीश सगदेव आणि ज्योती कानेटकर या कलाकारांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला. श्री युवराज गायधनी आणि सुभाष भंडारे यांनी तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळली.
तीन वेगवेगळ्या विषयांवर विनोदी प्रहसने सादर करून ज्योती इंगोले, सुनंदा चोपडे, कुसुम जाधव, दलिचंद शिंगवे, मनिषा मिसाळ यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यात श्री. नरेंद्र मिसाळ
यांनी नटसम्राट मधील संवाद उत्तमरित्या सादर केले.
कार्यक्रमाला माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, मा. नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, बाळासाहेब शिंदे, सरिता साने, मा. नगरसेविका भारती फरांदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी कुलकर्णी यांनी केले.
उपस्थित रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.