मुलांची प्रकृती गंभीर,अन्य तिघे जखमी; अधिक उपचारासाठी गोवा येथील खासगी रुग्णालयात हलविले…
सावंतवाडी
एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात तुळस येथील वनकर्मचारी विष्णू शेरपा नराळे यांचे कुटुंब जखमी झाले. त्यातील सहा वर्षाचा वरद हा मुलगा गंभीर जखमी असून त्याला गोवा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज सायंकाळी तुळस येथे सावंतवाडी-वेंगुर्ला या राज्यमार्गावर घडला. विष्णू नराळे वय ३२ ,स्वरा वय ९, राणी २६ आणि वरद नरळे वय ६ अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहीती अशी की, तुळस येथे वनरक्षक म्हणून जबाबदारी बजावत असलेले श्री. नराळे आपल्या ताब्यातील दुचाकी घेवून वेंगुर्ले च्या दिशेने जात होते. यावेळी समोरुन येणार्या वेंगुर्ला-सावंतवाडी या बसला त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक बसली. यात त्याचा मुलगा वरद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर विष्णू यांच्यासह अन्य तिघे सुध्दा जखमी झाले आहेत.अशा परिस्थितीत त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वरद याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे अधिक उपचारासाठी त्यांना गोवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमींवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी पांडुरंग वजराठकर, संदिप सावंत, विक्रात सावंत आदींनी उपचार केले तर सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर व अमृत शिंदे यांनी जखमींना घेेवून गोव्याकडे धाव घेतली.