जादूटोणामुळे वातावरण तणावग्रस्त
न्हावेली गावात मतदान केंद्राबाहेर कोहळा
निवडणुकांचा पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गावागावात कुंकू, बुक्का लावलेला कोहळा, ओवाळणी, फोडलेले नारळ, भाजून टाकलेले नारळ, टाचण्या टोचलेली लिंबू, मिरच्या, तांदूळ टाकणे असे भोंदूगिरीचे अनेक प्रकार केलेले उघडकीस येतात. याला देवपान करणे असेही म्हणतात. आपल्या विरोधकांना निवडणुकीत अपयश यावे आणि आपला विजय व्हावा यासाठी भोंदूबाबा, मांत्रिक हाताशी पकडून विशिष्ठ पक्षांकडून असे प्रकार करण्यात येत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून उघडकीस येत आहे.
गावागावात देवपान या विषयाला अजूनही गोरगरीब लोक घाबरतात हे देखील सत्य आहे आणि याचाच फायदा घेत अनेक ठिकाणी देवपान सारखे प्रकार सुरू असतात. त्यामुळे ज्या ज्या गावात अशा प्रकारचे भोंदूगिरीचे प्रकार चालतात, तिथे ग्रामस्थ मानसिक तणावाखाली असल्याचे आढळून येते. सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात अशाच प्रकारे रस्त्याच्या कडेला कोहळ्याला काजळ, कुंकू लावून देवपान केल्याचे आढळून आले. त्यामुळे जागृत ग्रामस्थांनी मतदान प्रक्रियेला गालबोट लागू नये यासाठी मतदानानंतर बैठक घेऊन गाव पातळीवर हा विषय घेण्याचे ठरविले. अशा प्रकारच्या देवपानामुळे तणावाचे वातावरण असल्याचे स्पष्ट दिसून येत होते.
देश विकासाच्या दिशेने जात असताना आणि समाज सुधारत असताना अजूनही भोंदूगिरीवर विश्वास ठेवून अंधश्रद्धेपोटी अशा प्रकारच्या विकृत गोष्टी करण्यावर आजही काही समाजकंटक, लोकप्रतिनिधी आणि नेत्यांकडून केले जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना अद्दल घडवायची असेल तर ती जनतेने आपल्या निवडणुकीच्या माध्यमातूनच घडविली पाहिजे. तरच अशा प्रकारचे चुकीच्या रितीभाती बंद होतील आणि खऱ्या अर्थाने समाज सुधारल्याचे दिसून येईल.