प्राथमिक शिक्षक संघटनेची मागणी
ओरोस
2019 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या 6 वी ते 8 वी वर्गाच्या शाळांमध्ये शासनाच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीव्दारे नियुक्त विज्ञान, गणित पदवीधर शिक्षकांना शिक्षणसेवक कालावधी 3 वर्षे पूर्ण झाल्यावर एस 14 पी बी 2 पदवीधर वेतनश्रेणी तात्काळ मंजूर करणेबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या शिष्टमंडळाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे मागणी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव, कणकवली महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेहा मोरे, विज्ञान गणित पदवीधर शिक्षक प्रतिनिधी गोरख जगदाणे (दोडामार्ग), किरण पवार (देवगड), भूषण जगताप (देवगड), अमित खामकर (देवगड) आदी उपस्थित होते.
शासनाने पवित्र पोर्टल व्दारे 2019 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात इयत्ता 6 वी ते 8 वी वर्गाच्या जि प शाळांमध्ये एकूण 78 विज्ञान, गणित पदवीधर शिक्षकांना शिक्षण सेवकपदी नियुक्ति देण्यात आली. यामध्ये देवगड 39, वेंगुर्ला 27, मालवण 6, दोडामार्ग 6 अशा तालुक्यांत पदवीधर शिक्षकांचा समावेश करण्यात आला. या शिक्षकांचा 3 वर्षांचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण होवून नियमित वेतनश्रेणीबाबत प्रस्ताव जि प शिक्षण विभागाकडे मंजूरीसाठी प्रलंबित आहेत. याबाबत प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी सिंधुदुर्ग व प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन निवेदन व चर्चा करण्यात आली.