*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भैरवी*
झाली वेळ आता
घ्यायचा आहे निरोप
गाऊनी सूर भैरवीचे
करावा मैफलीचा समारोप…
मन माझे दाटून येते
वळून मागे पाहताना
कसे होते ओलेते
आठवणी ओघळताना…
किती वाटा तुडवल्या
झेलले वारे वादळे
किती खड्डे वाळवंटे
कधी ओअॅसीस आगळे..
कधी रानसुमने ऊगवली
फुले काटे सारे वेचले
मोडले पण नाही वाकले
कडु गोड पार जाहले..
कळेना मन का ओलावते
आता चंद्र आभाळीचाही
ऊगा भासतो थकलेला
मार्ग मंद होतो ढगांचाही…
वेध लागले पलीकडचे
सोडून जाता जीवलगांना
पापणीत अडकल्या थेंबानो
मिटून घ्या अलगद सूरांना….
राधिका भांडारकर