बांदा
भात विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना पावती व कागदपत्रे सावंतवाडी येथे नेण्यासाठी पदरमोड करून अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शासनाने यासंदर्भातील अट शिथिल करून पूर्वीप्रमाणे केंद्रातच सर्व कार्यवाही करावी अशी मागणी मडुरा सोसायटी चेअरमन संतोष परब यांनी शासनाकडे केली आहे.
राज्य शासनाच्या खरीप पणन हंगाम 2021-22 आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत मडुरा सोसायटी येथे भात खरेदी शुभारंभ करण्यात आला. सोसायटी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. संचालक अशोक कुबल, प्रकाश गावडे, आत्माराम गावडे, प्रकाश सातार्डेकर, सुनंदा परब, गटसचिव सुभाष राऊळ, वरिष्ठ लिपीक प्रकाश जाधव, सेल्समन सोमनाथ परब, श्रेया परब आदी उपस्थित होते.
शासनाने भात खरेदी करताना जे जाचक अटी ठेवलेल्या आहेत त्या शिथिल कराव्यात तसेच शेतकऱ्यांना मिळणारा बोनस पुन्हा सुरू करावा अशी मागणी संचालक प्रकाश गावडे यांनी यावेळी केली. तर खरीप पणन हंगाम आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनाने भात खरेदीसाठी प्रति क्विंटल २०४० रुपये दर निश्चित केला आहे. ज्या शेतकर्यांनी अॉनलाईन भात नोंदणी केली आहे अशा शेतकर्यांनी भात नोंदणी केलेला सातबारा घेऊन भात विक्रीसाठी आणावे असे आवाहन चेअरमन संतोष परब यांनी केले आहे.