कुडाळ
मांडकुली-फौजदारवाडी येथील ४८ वर्षीय तरुणाचा मृतदेह घराच्या बाजूला असलेल्या शेत विहिरीत आढळून आला. श्रीकृष्ण मसुरकर, असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ते कालपासून बेपत्ता होते. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात श्रीपाद मसुरकर (रा. फौजदारवाडी) यांनी खबर दिली की, त्यांचे काका श्रीकृष्ण मसूरकर हे एकटेच राहत होते. त्यांची पत्नी मुलग्याला घेवुन गेली १० वर्षापासून माहेरी राहते. ते दोन-दोन दिवस आजुबाजुच्या गावात, परिसरात फिरत असतात. त्यावेळी ते घरी येत नाहीत. १२ डिसेंबर सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास ते घरी दिसुन आले होते. त्यानंतर पुन्हा ते घरी दिसून आले नाहीत. दुसऱ्या दिवशी घरी येतील, असे आम्हाला वाटले त्यामुळे त्यांची शोधाशोध केली नाही. मात्र आज त्यांचा मृतदेह घराशेजारील शेतविहिरीत आढळून आला.