कणकवली
आमदार नीतेश राणे यांनी नांदगाव येथे रविवार ११ डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत ‘आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत.’ असे वक्तव्य केले होते. श्री. राणे यांनी अशी धमकी देऊन आचारसंहितेचा भंग केला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नांदगाव शाखाप्रमुख हनुमंत उर्फ राजा म्हसकर यांनी नांदगाव निवडणूक निर्णय अधिकारी- यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. भाजप पुरस्कृत पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार रविराज मोरजकर यांचा प्रचार कण्यासाठी आमदार नीतेश राणे हे नांदगाव येथे रविवारी आले होते. दुपारी ३ वा. नांदगाव तिठा येथे प्रचारसभेत बोलताना राणे यांनी वरील वक्तव्य केले. वक्तव्याची व्हीडिओ क्लिप देखील व्हायरल होत आहे. राणे यांच्या वक्तव्यामुळे नांदगाव ग्रामस्थांमध्ये चीड व दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे निवेदनात म्हटले आहे