*शिवसेना शाखाप्रमुख राजा म्हसकर यांची पोलीस निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार*
कणकवली :
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत त्यामुळे आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही” अशी धमकी आमदार नितेश राणे यांनी देत आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा नांदगाव ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राजा म्हसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक १८ डिसेंबर २०२२ रोजी होत आहे. भाजप पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार असलेले रविराज मोरजकर यांचा प्रचार करण्यासाठी कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे दि.११ डिसेंबर २०२२ रोजी नांदगाव येथे आले होते. दरम्यान दुपारी ३.०० वा. नांदगाव तिठा येथे प्रचार सभेत भाषण करते वेळी आमदार नितेश राणे यांनी “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, माझ्या अधिकाराखाली आहेत.आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही” अशी धमकी सर्वांसमक्ष दिली त्याची व्हीडीओ क्लिप देखील वायरल होत आहे. आचार संहीतेच्या कालावधीत अश्या प्रकारची धमकी देऊन आ. नितेश राणे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. आ. नितेश राणे यांच्या सदर वक्तव्याची व्हीडीओ क्लिप आपणास सादर करत आहोत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नांदगाव ग्रामस्थांमध्ये भयंकर चीड व दहशत निर्माण झाली आहे.
तरी आचार साहितेचा भंग केल्याप्रकरणी व नांदगाव ग्रामस्थांना धमकी दिल्या प्रकरणी आ. नितेश राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा नांदगाव ग्रामस्थांच्या समवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राजा म्हसकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.