You are currently viewing जाहिराती चांगल्या की वाईट

जाहिराती चांगल्या की वाईट

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*वक्रतुंड साहित्य समूहाचे सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ.सतीश शिरसाट लिखित अप्रतिम लेख*

*जाहिराती चांगल्या की वाईट*

*एक प्रकाशझोत*
………….
‘ उत्पादन किंवा सेवा यांच्याकडे लक्ष वेधून घेण्याची पध्दती आणि तंत्र म्हणजे जाहिरात ‘ असं म्हटलं जातं.आदिम काळापासून गुहेत रहाणारा माणूस पुढे कळप करून राहू लागला.प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस तो या सुरवातीला खात होता.पुढे कुटुंबव्यवस्था अस्थित्वात आली.कुटुंबाला सोयीस्कर अशी भौगोलिक रचनेनुसार घरं तो बांधू लागला. ही कुटुंबं एकत्र पध्दतीची होती.लहान मुलांपासून वृद्ध कुटुंबसदस्य यात होते.या कुटुंबाच्या दैनंदिन गरजाही वाढल्या. पुढेपुढे खेडी आणि वस्त्या अस्तित्वात आल्या.काही मोठी नगरेही अस्थित्वात आली.कुटुंबाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारची लोणची,कुरडया,पापड ,सांडगे, पेनवड्या बाटल्यांमधून, डब्यांतून किंवा काचेच्या बरण्यांतून भरून ठेवली जात. उन्हाळ्यात मला आठवतं गावोगावी प्रत्येक घरांतून शेवया करण्याचे कारखानेच दिसत.अर्थात पूर्वीच्या काळी खेड्यांतून शेतात भाजीपाला पिकवला जाई.तरीही सगळ्यांना तो सदासर्वकाळ उपलब्ध होईलच अशी स्थिती नव्हती. अशा वेळी आठवडे बाजारातून आणलेले बटाटे, वांगी,शेवग्याच्या शेंगा आणि काही परिस्थितीत भिजत घातलेली कडधान्यं यावरच बेगमी केली जाई.जोडीला साठवून ठेवलेले पदार्थही असत. दिवसेंदिवस लोकांच्या गरजा या वाढतच गेल्या. नोकरी,
व्यवसायासाठी घरातले पतिपत्नि आणि तरुण बाहेर पडू लागले.आणि जीवनावश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी उद्योग ही संकल्पना उदयाला आली.ज्या गोष्टी पूर्वी गृहिणी आणि लेकीबाळी घरच्या घरी करत त्यांचे कारखान्यांतून उत्पादन होऊ लागले.विविध अन्नपदार्थ,प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ,फळे,ज्यूस, लोणची, पापड, कुरडया, पापड्या इतकेच काय, उकडलेल्या, शिजवलेल्या भाज्या, भाकरी, पराठे अशा अनेकविध खाद्यपदार्थांचे उत्पादन सुरु झाले.हे झाले आपल्याकडे.परदेशांतून त्या त्या भौगोलिक रचनेनुसार, उपलब्धतेनुसार आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांनुसार अनेक पदार्थांचे उत्पादन सुरु झाले.मागे मी इंग्लंडला गेलो होतो.तिथल्या माॅलमधून चपात्याही विकल्या जातात हे मी पाहिलं.अर्थात हल्ली आपल्याकडेही दुकानांतून ते दिसते.माॅलच्या बाहेर तिथे मिळणा-या वस्तु आणि पदार्थांची जाहिरात केली होती.पूर्वी मी माॅरिशसला गेलो होतो.तिथल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर असणा-या शेकडो हाॅटेलांंतून मिळणा-या पदार्थांची सोय होती.अर्थात माझ्यासारख्या परदेशी पर्यटकाला ते कळावं म्हणून स्थानिक भाषेबरोबर
इंग्रजीत त्यांचे भाषांतर मेनूकार्डवर पहायला उपलब्ध होतं.जाहिराती अनेक प्रकारच्या असतात. पूर्वी सोशल मिडीया आणि जनसंपर्क माध्यमं फारशी नव्हतीच.माझ्या लहानपणी ग्रामपंचायतीच्या ऑफिसात दै.सकाळ संध्याकाळी वाचायला मिळे.त्यातून विविध प्रकारच्या वस्तुंच्या जाहिराती वाचायला मिळत. सायकल किंवा एस.टी.तून वेगवेगळ्या गावांना जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या भिंतीवर अनेक दुकानं किंवा मोठया गावांत मिळणा-या वस्तू, औषधं यांच्या जाहिराती पहायला मिळत.त्यामुळे घरांच्या भिंतींना मजबूती मिळे.वृत्तपत्रांसह, साप्ताहिकं, मासिकं,अर्धवार्षिकं, वार्षिकं अगदी अनियतकालिकांचाही नियतकालिकांत समावेश होतो.पुढं या नियतकालिकांचा सुळसुळाट वाढला आणि साहित्य, शेती, खेळ, वैद्यकीय क्षेत्रे,बांधकाम अशा नियतकालिकांतून अनेक जाहिरातींचा अक्षरश: पाऊस पडला.अशा नियतकालिकांतून संबंधित विषयांवर उपयुक्त माहीती मिळत गेली.अनेक सरकारी नियतकालिकांतून शेतीचे उत्पादन वाढवणा-या क्लृप्त्या आणि अनेक विकासयोजना शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे पोहोचल्या.


अनेक प्रतिथयश मराठी आणि अगदी हाॅलीऊडच्या नटनट्या, खेळाडू तसेच अनेक क्षेत्रांतील सेलीब्रेटीज नियतकालिके, टीव्ही,शेकड्यांनी उगवलेले चॅनेल्स आणि सोशल मिडीयाची वाढती लोकप्रियता पाहून त्यात विविध जाहिराती करतात.अर्थातच या वस्तुंच्या किंमतीही त्यामुळे भरमसाठ वाढतात. या जाहिराती पाहून लोक त्या खरेदीही करतात. जाहिरात करणा-यांची लोकप्रियता आणि त्यांनी केलेली जाहिरात, जाहिरातीत वापरलेले विविध इफेक्ट्स यांचा संयुक्त परिणाम त्या वस्तुंच्या विक्रीवर होतो.


आजकाल अनेक गॅल-यांमधून नामवंत आणि नवोदित चित्रकारांच्या कलाकृतींची प्रदर्शने आयोजित केली जातात. यांतून ते आपल्या चित्रांची जाहिरातच करतात. चित्रांप्रमाणेच कपडे आणि संसारोपयोगी साहित्यांचीही प्रदर्शने ठिकठिकाणी आयोजित केली जातात. यांचा परिणाम म्हणून अशा वस्तूंची विक्रीही होते.जाहिरातींचा हा एक प्रकार. अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून विविध कापड दुकाने,औषधे,काही उत्पादित वस्तु आणि सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती केलेल्या आढळतात. काही ठिकाणी त्या भडकपणाने केल्या जातात. त्यांतून स्त्रियांचा अवमान केला जातो,अनेकदा मानवी मूल्ये पायदळी तुडवली
जातात. अनेक सार्वजनिक उत्सवांतून.रस्त्यांवर खोदाई करून कनाती टाकलेल्या असतात. त्यावर अनेक जाहिराती असतात.
जाहिरातींचा जनमानसावर खोल परिणाम होतो.त्यातून त्या चीजवस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो.मात्र या जाहिरातील वस्तु/ खाद्यपदार्थ/ पेये/ सौंदर्यप्रसाधने ही आरोग्य, माणसांचा आत्मसन्मान,सामाजिक आणि देशाची प्रतिष्ठा ,कायदा आणि सुव्यवस्था यांना धक्का बसणार नाही ना ? हे पाहूनच त्या खरेदी करणं ही लोकांची जबाबदारी आहे.अर्थात अनेक सरकारी ,अशासकीय संस्था याविषयी लोकशिक्षण आणि प्रबोधन करतातच.मात्र याची व्याप्ती वाढवली पाहिजे.उच्च शिक्षण संस्था या बाबतीत मोलाची भूमिका बजावू शकतात कारण त्यांच्याकडे युवाशक्ती मोठ्या प्रमाणावर असते.पूर्वीच्या काळी समाजमाध्यमे , जनसंपर्क माध्यमे आणि प्रसारमाध्यमे नव्हती.असलीच तर कमी प्रमाणात होती.त्याही वेळेस इथले अनेक संगीतकार,गायक, लेखक, कवी, पहिलवान आणि लहानमोठे उद्योजक यांची किर्ती सातासमुद्रापार पसरली होती.अजिंठा वेरूळची लेणी यांची माहीती कोणत्याही औपचारिक जाहिरातीशिवाय जगभर पसरली होती.ताजमहाल किती भव्य आणि सुंदर आहे याचे फ्लेक्स कुठेही लावले नव्हते. माझ्या आठवणीतील एक गरीब कार्यकर्ता कोणत्याही प्रचाराशिवाय प्रचंड बहुमताने तालुक्याचा आमदार म्हणून निवडून आला होता.आणि ते आमदार लोकसेवेतून जनतेच्या गळ्यातला ताईत बनले.मला आठवतं,मी पुण्याला असताना,असेच एक सामान्य गृहस्थ कोणत्याही प्रचाराशिवाय सहज निवडून येत.हे सगळं कसं घडलं ? वर उल्लेख केलेल्या दोन्ही उदाहरणांत आणि भारतीय वास्तु आणि शिल्पांच्या बाबतीत या सर्वांना जी लोकप्रियता मिळाली,ती आजच्यासारख्या जाहिरातींमुळे नव्हे तर mouth to mouth publicity मुळे. त्यांच्या यशाचे गमक हेच. या भूतलावर ‘ जाहिरात ‘ ही संकल्पना जेव्हापासून उदयाला आली,तेव्हापासून mouth to mouth publicity चे स्थान मोठे होते आणि भविष्यातही रहाणार आहे.

@ प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

प्रतिक्रिया व्यक्त करा