You are currently viewing बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित होऊ शकणाऱ्या प्रदूषणकारी रिफायनरी विरोधात अधिवेशनात आवाज उठवा

बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित होऊ शकणाऱ्या प्रदूषणकारी रिफायनरी विरोधात अधिवेशनात आवाज उठवा

रिफायनरी विरोधी संघटनेची आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी

बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेत बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित होऊ शकणाऱ्या प्रदूषणकारी रिफायनरी विरोधात येत्या विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी केली. तसेच रिफायनरी विरोधी मेळाव्याला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठींबा दर्शविणार असल्याचे सांगितले. तसे निवेदन रिफायनरी विरोधी संघटनेने दिले आहे. यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी संघटनेची भूमिका जाणून घेत मागणी मान्य केली.


रिफायनरी विरोधी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,नाणार परिसरातील रद्द झालेली प्रदूषणकारी रिफायनरी आता बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पामुळे कोकणाचे रासायनिक गटार होणार आहे. या प्रकल्पाचे गंभीर दुष्परिणाम हापूस आंबा, मासेमारी व पर्यटन या शाश्वत उपजीविकेच्या साधनांवर होऊन स्थानिक कोकणी माणूस देशोधडीला लागणार आहे. नुकत्याच झालेल्या देवगड किनाऱ्यावरील तेल गळतीचे मासेमारी व पर्यटन यावर काय परिणाम झाले हे सर्वानी बघितले आहेत. राजापूर , देवगड असा हा केमिकल झोन पूर्ण दक्षिण कोकणाला काबीज करू शकतो. तसे नियोजनही सध्याचे सरकार करत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कोकणात पायच ठेवू द्यायचा नाही हीच गोष्ट आपणा सरख्या कोकणप्रेमी लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित आहे
येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात आपण कोकणात रिफायनरी सारखे प्रकल्प नको, परप्रांतीयांनी केलेले व्यवहार, ग्रामस्थ आंदोलकांवर होणारी दडपशाही, तडीपारीच्या नोटिसा, बेकायदेशीर सर्वे आदी मुद्दे उचलून धरावेत तसेच या भागातील वारसास्थळ असलेली कातळशिल्प संरक्षण हा महत्वाचा मुद्दा देखील आपण विधानसभेत उचलावा. शिवसेना पक्ष हा नेहमीच जनतेसोबत असतो म्हणून पक्षाची रिफायनरी विरोधी भूमिका स्पष्ट करण्यात आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी रिफायनरी विरोधी संघटनेने आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सचिव सतीश बाणे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव,दीपक जोशी,भगवान सोगम, सदानंद सोगम, रमेश सोडये, रामचंद्र शेळके, शशिकांत मांडवकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा