You are currently viewing वैभववाडीत राज्यस्तरीय आनंदीबाई मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडीत राज्यस्तरीय आनंदीबाई मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाने आनंदीबाई रावराणे यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातर्फे दिनांक ८ डिसेंबर, २०२२ रोजी वैभववाडी येथे आनंदीबाई रावराणे यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त ५ किलोमीटर राज्यस्तरीय आनंदीबाई मॅरेथॉन स्पर्धा, महाविद्यालय अंतर्गत मुला-मुलींसाठी ऐकेरी बॅडमिंटन स्पर्धा व स्पंदन विभागाच्यावतीने महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिला संबंधित भित्तीपत्रके प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन वैभववाडीचे पोलीस निरीक्षक श्री.अमित यादव, नायब तहसीलदार सौ.सविता कासकर, स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे, सचिव श्री.प्रमोद रावराणे,प्राचार्य डॉ. सी.एस.काकडे यांनी श्रीफळ वाढवून केले. राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आठ जिल्हामधून १९५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यामध्ये १५९ पुरूष व ३६ महिला सहभागी झाल्या होत्या. राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरूष गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे प्रधान किरूळकर, अक्षय पडवळ, ओंकार बायकर व महिला गटातून तेजस्वी नमये, सोनल येंडे व सिद्दी रावले यांनी मिळवला. या दोन्ही गटातील स्पर्धकांना अनुक्रमे रु.५०००, रु.३००० व रु.२००० रूपये रोख बक्षीस,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर बक्षिसे श्री. हरीश जनक, उद्योजक, वैभववाडी यांनी पुरस्कृत केली होती. तसेच आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित दि.७ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मुला-मुलींची ऐकेरी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन श्री.सज्जनकाका रावराणे, अध्यक्ष स्थानिक समिती यांनी केले. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे चेतन पेडणेकर, सर्वेश सोमण व राकेश कदम आणि मुलींमध्ये आशा पाटील, भाग्यश्री पांचाळ व श्वेता सावंत हे विजेते ठरले.त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या दोन्ही स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार मा.प्रसन्नजीत चव्हाण, नायब तहसीलदार सौ. सविता कासकर, नगराध्यक्षा नेहा माईणकर, संस्था पदाधिकारी सज्जनकाका रावराणे, प्रमोद रावराणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. सी. एस.काकडे, उपप्राचार्य ए. एम. कांबळे,जिमखाना प्रमुख प्रा. सचिन पाटील, IQAC समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट, अधिक्षक संजय रावराणे, प्राध्यापक, विद्यार्थी व सहभागी स्पर्धक उपस्थित होते.
वैभववाडी सारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून क्रीडा संस्कृती रुजविण्याचा महाविद्यालयाने केलेला प्रयत्न महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येकांने ससा आणि कासव यांच्या शर्यतील कासवाच्या गतीने परंतु योग्य वेळी सश्याच्या गतीने वाटचाल केल्यास जीवनात यशस्वी होता येते असे वैभववाडीचे नुतन तहसिलदार श्री. प्रसन्नाजीत चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख प्रा.सचिन पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.के.पी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलेश कारेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा