जय-पराजय यांचा विचार न करता खेळातील सहभाग महत्वाचा
– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
क्रीडा क्षेत्र सर्वांना समान संधी उपलब्ध करुन देणारे क्षेत्र आहे. खेळामध्ये जिंकण्यापेक्षा त्यामध्ये सहभाग घेणे महत्वाचे आहे. जय-पराजय याचा विचार न करता प्रत्येक खेळ प्रकारात खेळाडुंनी सहभाग घेतल्यास जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृह यांच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आलेला आहे. या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲङ संदेश तायशेटे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, माविमचे जिल्हा व्यवस्थापक नितीन काळे, बाल कल्याण समिती सदस्य सर्वश्री अॅड. अरुण पणदूरकर, अॅड. नम्रता नेवगी, प्रा.माया रहाटे, प्रा. अमर निर्मळे,बाल न्याय मंडळाच्या सदस्या कृतिका कुबल, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अशोक रायबान, मुख्याध्यापिका निलम बोर्डवेकर यांची उपस्थिती होती.
सध्या जागतिकस्तरावरील फुटबॉलच्या स्पर्धा सुरु आहेत. यास्पर्धेत अनेक देशांनी सहभाग घेतला आहे. यामधील काही देश अत्यंत पुढारलेले तर काही देश मागासलेले आहेत.पण खेळामध्ये जो जिंकतो तोच देश विश्वविजेता ठरतो,असे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोरोनामुळे गेली दोन वर्षे या स्पर्धा होवू शकल्या नाहीत. आता तीन दिवस सुरु राहणाऱ्या या स्पर्धेत बालगृहातील मुलांना अनेक खेळांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सामान्य मुलांबरोबर बालगृहातील मुलांचा आनंद व्दिगुणीत होईल, असे सांगून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडुंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन, शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृह सिंधुदुर्ग येथील अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व जिल्ह्यातील बाल संगोपन योजना लाभार्थी मुले व मुली तसेच अन्य मुले व या मुलांमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कला व सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲङ तायशेटे यांनी, खेळतांना खेळाडू वृत्तीने खेळ करा, खेळात जिंकण्याची मजा घ्या, आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी सदैव प्रयत्न करीत रहा, असा संदेश देवून शुभेच्छा दिल्या.
जिल्हा माहिती अधिकरी प्रशांत सातपुते म्हणाले, बालपणी मराठी शाळेतून मिळणारी शिकवण हीच आयुष्याची खरी शिदोरी आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कला-गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन महत्वाचे आहे. मन, मनगट आणि मेंदुचा विकास होण्यासाठी मैदानावरील खेळ आवश्यक आहेत. स्पर्धेमध्ये विजेत्यांनी कायम विजयी राहण्यासाठी प्रयत्न करावा, उपविजेत्यांनी विजेता होण्यासाठी प्रयत्न करीत राहीले पाहीजे तर अपयश आलेल्यांनी विजयी होण्यासाठी प्रयत्न करीत राहीले पाहिजे, असा संदेश देवून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडुंना रोटरी क्लब, कुडाळ यांच्या कडून टोपी तसेच वसतीगृहातील मुलांना बूट व कपडे उपलब्ध करुन दिल्याबद्दल रोटरी क्लबचे सदस्य प्रमोद भोगटे, अमित वळंजू, अजिंक्य जामसंडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, बालगृह निरीक्षणगृहातील बालकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिला बाल कल्याण कार्यालातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, संरक्षण अधिकारी मिलन कांबळे, परिविक्षा अधिकारी महेश सावंत, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन करुन शेवटी सर्वांचे आभार मानले.