ध्वजदिन निधी संकलनास सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी.
– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
देशाच्या रक्षणार्थ सैनिक आपले योगदान देत असल्यानेच आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. ही भावना प्रत्येक नागरिकांनी लक्षात ठेवली पाहिजे सैनिकांच्या कल्याण निधीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी ध्वजदिन निधी संकलनास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या डीपीसी सभागृहात जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने सन -2022 चा ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, कुडाळचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने उपस्थित होते.
आपला राष्ट्रध्वज आपला अभिमान आहे. हा अभिमान देशाला एकसंघ बांधून ठेवतो. असे सांगून, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, राष्ट्रध्वज एकात्मतेचे प्रतिक आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. यानिमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी राष्ट्रध्वज फडकवून देशभक्ती जागविली. संरक्षण दलाबद्दल देशामध्ये एक चांगली व अभिमानाची भावना आहे. सर्वच आपत्तीवर मात करण्याची क्षमता संरक्षण दलामध्ये आहे. या दलामध्ये कामकाज अत्यंत शिस्तबध्दतेने चालते, देशाच्या रक्षणासाठी सैन्यदलातील जवान सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत, त्यामुळे आपण सुखाचे जीवन जगत आहोत.
पोलीस अधीक्षक श्री.अग्रवाल म्हणाले, सैनिक व पोलीस यांचे विशेष नाते आहे. सैनिक देशाच्या सीमेवर संरक्षणाचे कर्तव्य पार पाडतो तर पोलीस देशाअंतर्गत नागरिकांच्या संरक्षणाचे काम करीत असतो. सैनिकांच्या कुटुंबियांना कायदा व सुरक्षीतेबाबतच्या आवश्यक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असेल. असे सांगून त्यांनी शहीद जवानांप्रती आदरांजली वाहिली.
डॉ. फड यांनी प्रास्ताविकामध्ये ध्वजदिनाचा पूर्व इतिहास सांगितला. ध्वज दिन निधी संकलनातून मिळणाऱ्या निधीमध्ये कोणकोणते उपक्रम राबविले जातात हे सांगून, सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपक्रम व कामाकाजबाबत माहिती दिली.
प्रारंभी शहीद जवांनाना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. माजी सैनिक सतीश मळभ यांचे पुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त शैलेश मळभ याचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला.
जागेवर जावून वीरपत्नी, वीरमाता यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला सन्मान
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल यांनी व्यासपीठावरून उतरुन वीरपत्नी सरस्वती राजगे, विद्या नाईक, रोजालीन रॉड्रिक, मिनाक्षी शेडगे, तिलोत्तमा सावंत,सुप्रिया तेजम, वीरमाता अक्षता सावंत, प्रतिभा सरमळकर यांच्या जागेवर जात त्यांचा सन्मान केला.
न्यू इंग्लिश स्कुल, ओरोसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले या गीताचा प्रमुख गायक कु. ध्रुव याचा जिल्हाधिकाऱ्यांनी शाल देवून सन्मान करीत त्याच्या आवाजाचे कौतूक केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संतोष परब, धोंडीराम पाटील, बाबुराव धुरी, संताजी राणे, विक्रांत सुडजी, अनिल माटलेकर व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार श्रीधर गावडे यांनी मानले.