इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे सकाळच्या थंडीतही धावपटूंचा प्रचंड उत्साह, अंतर पूर्ण करण्याची जिद्द, उपस्थीत प्रेक्षकांची मिळणारी दाद, ठिकठिकाणी वाद्यांचा गजर अशा वातावरणात येथे मॅरेथाॅन स्पर्धा झाली. कोरोना महामारी नंतर झालेल्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. इचलकरंजी रनर्स फाउंडेशन आयोजित या स्पर्धेत महिला आणि जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला.
मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पहाटेपासूनच येथील डीकेटीई राजवाडा प्रांगणात स्पर्धक जमत होते. या स्पर्धेत पुरुष व महिलांसाठी १८ ते ३०, ३० ते ४५ ,४५ ते ६० आणि ६१ च्या पुढील असे वयोगट होते. सर्वच वयोगातील नागरिकांचा सहभाग उत्स्फूर्त राहिला. सुरुवातीला झुंबाच्या तालावर धावपट्टूंचा हालका वार्म-अप घेण्यात आला. त्यानंतर ५, १०, २१ आणि ४२ किलोमीटर अंतराची स्पर्धा सुरु झाली. आमदार प्रकाश आवाडे, डीकेटीईच्या मानद सचिव डाॅ.सपना आवाडे, श्रध्दा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा.ए.आर तांबे, आयएम फिट क्लबचे महेश शेळके, भारत केटकाळे, गोरखनाथ सावंत, नितेश पाटणी, अंकीत सोनथीलाया, संदीप मोघे, महेश मेटे यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेमुळे मुख्य मार्गावर एकप्रकारे चैतन्य निर्माण झाले होते. स्पर्धकांना ठिक-ठिकाणी नागरिकांकडून प्रोत्साहीत करण्यात येत होते. स्पर्धा पूर्ण केल्याचे मोठे समाधान सर्वच स्पर्धकांच्या चेह-यावर दिसून येत होते. स्पर्धेत महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला. जेष्ठ नागरिकांनी घेतलेला सहभाग अनेकांना प्रेरणादायी ठरला. स्पर्धेत इथोपिया येथून आलेल्या दोन स्पर्धकांनी शहरवासियांचे लक्ष वेधले. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मेडलसह सेल्फी घेण्याची स्पर्धकांची धांदल सुरु होती. खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी ठिकठिकाणी पारंपारीक वाद्यांचा गजर करण्यात आला. सोबत अलायन्स हाॅस्पीटलचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. अभूतपूर्व उत्साहांने सळसळलेली ही स्पर्धा संस्मरणीय ठरली.