You are currently viewing दोडामार्गात २८ ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी तब्बल ९४ तर २२३ सदस्य पदासाठी ३८६ उमेदवारी अर्ज दाखल..

दोडामार्गात २८ ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी तब्बल ९४ तर २२३ सदस्य पदासाठी ३८६ उमेदवारी अर्ज दाखल..

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यातील होऊ घातलेल्या २८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी ४७ सरपंच तर २२१ सदस्य जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण २८ सरपंच पदासाठी ९४ तर २२३ सदस्य पदासाठी ३८६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही दोन्ही संख्या ४८० वर पोहचली आहे.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने व ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची निवडणूक विभागाने मुभा दिल्याने एकाच दिवशी विक्रमी २६८ जणांनी अर्ज दाखल केले. अनेक दिग्गज यावेळी थेट सरपंचपदी आपले नशीब आजमावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी सरपंचांपैकी खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, परमे सरपंच आनंद नाईक, कोनाळ सरपंच पराशर सावंत यांसह अनेक जण सरपंच व सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी बुजुर्ग सुद्धा या निवडणुकीत सामोरे जात आहेत.

 

तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक होत असून २८ नोव्हेंबर ते शुक्रवारी २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांसह नायब तहसीलदार नाना देसाई, संजय गवस निवडणूक शाखेचे पल्लवी पेडणेकर, हेमंत कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली व योग्य नियोजनाने तहसीलदार कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर खुल्या सभागृहात २८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसहीत कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख पणे पार पाडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा