सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज ठाकरे यांचा दौरा पूर्वनियोजित होता. तरी देखील कार्यकर्त्यांच्या बैठकीत काही मनसैनिक हजर झाले नाहीत, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांबाबत येत्या दोन दिवसांत पक्षप्रमुख राज ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, अनास्था आहे. पक्षात समन्वय राहिलेला नाही. मात्र राज ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन अनेक लोक काम करण्यास तयार आहेत. त्या दृष्टीने राज ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
स्वतः साहेब येणार हे माहीत असताना कणकवलीत सभागृह नाही? काय परिस्थिती आहे. एकंदरित पाहता राज ठाकरे यांनी येथे येऊ नये, अशी परिस्थिती आहे. साहेबांनी केवळ फोटो मारण्यासाठी यावं का ? काय करायचे ? महाराष्ट्र सैनिकांनी काम केलं पाहिजे. पदाधिकारी पदाला न्याय देऊ शकत नसतील तर खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? तुम्हीच विचार करावा, अश्या शब्दांत पदाधिकाऱ्यांना त्यांनी इशारा दिला.
कणकवली विधानसभा मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अवघ्या 5 मिनिटांची बैठक झाली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, माजी आ. परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.