सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावची ग्रामदेवता श्री.देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक ०१ डिसेंबर २०२२ रोजी पार पडत असून मागोमाग दिनांक ०२ डिसेंबर रोजी श्री.गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव पार पडणार आहे. सलग दोन्ही दिवस गावात जत्रोत्सव असल्याने अनेक चाकरमानी, गोवा आदी ठिकाणी राहणारे ग्रामस्थ, भाविक जत्रोत्सवासाठी गावात दाखल होत आहेत. ०१ डिसेंबर रोजी ग्रामदैवत श्री.माऊलीचा जत्रोत्सव होत असून सकाळ पासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. नारळ, केळी अर्पण करणे, महिलांकडून देवीची ओटी भरणे, पालखी प्रदक्षिणा सोहळा आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने पार पडतात.
शुक्रवार दिनांक ०२ डिसेंबर रोजी जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री.गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव पार पडत असून हाकेला धावणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या गिरोबाच्या जत्रोत्सवासाठी मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणी कामानिमित्त असणारे चाकरमानी मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने दाखल होतात. गिरोबा मंदिरात जत्रोत्सव दिवशी सकाळासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. अनेक भाविक भक्तगण श्री गिरोबाच्या चरणी लीन होतात. श्री.गिरोबावर असलेल्या श्रद्धेपोटी विश्वासाने भाविक नवस बोलतात आणि फेडतात देखील. सकाळपासूनच देवाला केळी नारळ अर्पण करणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होते. रात्री उशिरा श्री.माऊली मंदिरातून वाजत गाजत देवाच्या तरंगकाठी श्री गिरोबा मंदिरात येतात. तरंगकाठी श्री गिरोबा मंदिरात आल्यानंतर महिलांकडून ओटी भरण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. श्री.गिरोबा चरणी गाऱ्हाणे घालून नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम रितीरिवाजा प्रमाणे पार पडतात.
गाऱ्हाणी बोलणी झाल्यानंतर श्री.गिरोबाची मंदिरा भोवती पालखी प्रदक्षिणा होते. भक्तगण मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्यात भाग घेतात. अभंग, गजर, मंगलाष्टके म्हणत टाळ मृदंगाच्या साथीने भक्तिभावाने पालखी प्रदक्षिणा पार पडते. फटाक्यांची जोरदार आतषबाजी होते. रात्रौ उशिरा दोन्ही जत्रोत्सवात वालावलकर दशावतारी मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होतो. आरोस गावातील शक्तिस्थाने असलेल्या श्री.माऊली, गिरोबा दोन्ही जत्रोत्सव लागोपाठ येत असल्याने गावात येणाऱ्या पाहुणे, सगे सोयरे मंडळींना दोन्ही जत्रोत्सवाचा एकत्रच आनंद लुटता येतो. श्री.गिरोबा मंदिराचा ग्रामस्थांकडून जिर्णोद्धार केला जात असून मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. भाविकांनी जिर्णोद्धाराकरिता मदतीचा हात द्यावा अशीही हाक भक्तगणांना देण्यात आली आहे.