कणकवली
मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गवारेडा ठार झाला. ही घटना रात्री 12.15 वाजण्याचा सुमारस ओसरगाव गवळीवाडी येथील आंबेरकर दुकानासमोर घडली. अपघातानंतर वाहनासह चालकाने पलायन केले. महामार्गावर मृतावस्थेत पडलेल्या गव्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती सामजिक कार्यकर्ते बबली राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती त्यांनी वन विभागाचे अधिकारी व वाहतूक पोलिसांना दिली. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या गव्याला बाजूला करत खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मृत गव्याला उचलून ट्रॅक्टरमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी दिगवळेत नेले. याकामी बबली राणे, अक्षय राणे, नितीन धुरी, चेतन राणे, सूरज कदम, हेमंत आंगणे, सुनील राणे यांनी मदत कार्य केले.