You are currently viewing नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेची मुंबईत स्थापना

नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेची मुंबईत स्थापना

*ॲड. नकुल पार्सेकर यांची उपाध्यक्षपदी निवड*

 

सावंतवाडी :

 

कामगार क्षेञातील नवीन आव्हाने, बदलते कामगार कायदे, उदार आर्थिक धोरण व झपाट्याने होणारे जागतिकीकरण व यांञिकिकरण यामुळे कामगारांच्या रोजी कोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांच भवितव्य टांगणीला लागलेल आहे. राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेला अशा शोषित वर्गाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

मुंबईच्या आर्थिक व सामाजिक जडणघडणीत माथाडी व वाहतुक कामगारांचा फार मोठा वाटा आहे. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी या घटकांचा फक्त राजकीयच वापर केला. या शोषित कामगारांचे मुलभूत प्रश्न व त्याना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी यापूर्वी कामगार क्षेत्रात काम केलेल्या समविचारी व अनुभवी कार्यकर्त्यांनी एकञ येवून मुंबईत नवीन अखिल महाराष्ट्र माथाडी, वाहतुक आणि जनरल कामगार संघटनेची स्थापना केली असून या संघटनेच्या उपाध्यक्षपदी सिंधुदुर्चे सुपूञ व सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांची निवड करण्यात आली. श्री पार्सेकर यांनी टपाल खात्यात नोकरीला असताना सलग वीस वर्षे कामगार क्षेत्रात काम केलेले होते. भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी रस्ते कामगार, उषा इस्पात, खाते बाह्य डाक कर्मचारी अशा आस्थापनेत काम करणाऱ्या शेकडो कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला होता.

मुंबई, भायखळा येथील हाॅटेल हेरिटेज येथे संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेत निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्री यशवंत जाधव तर अध्यक्ष म्हणून श्री एस् आर हळदणकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे आणि ज्यानी अनेक सार्वजनिक हितासाठी जनहित याचिका दाखल करून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले असे जेष्ठ विधीज्ञ राकेश भाटकर यांची कायदेशीर सल्लागार म्हणून तर नवी दिल्ली येथील जेष्ठ व अभ्यासू पञकार यांची विशेष सल्लागार म्हणून निवड झाली आहे. या नवीन संघटनेचे समन्वयक म्हणून श्री अनिल घाडी काम पहाणार आहेत.

सर्वसाधारण सभेला पुणे, नाशिक, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे या भागातील कामगार क्षेत्रात काम करणारे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भायखळा, विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. यामीनी जाधव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा