*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. निलांबरी गानू कथन केलेली दिवंगत विक्रम गोखले यांची अविस्मरणीय आठवण*
*आठवणीत राहावी अशी आठवण*
दिवंगत विक्रम गोखले यांची एक अविस्मरणीय अशी आठवण माझ्याकडे आहे.
माझ्या मावस बहिणीची, रेखाताई दातार ची डिलिव्हरी होणार होती म्हणून मी आणि माझी आई पोहोचलो ती तिच्या आईकडे म्हणजे माझ्या मावशीकडे होती. दादरच्या प्लाझा टॉकीज च्या समोर.दोन दिवसांनी अनंत चतुर्दशी होती. तारीख होती *सात सप्टेंबर 1976* त्या दिवशीची गोष्ट
माझी आई आणि मावशी दोघी चटकन गणपतीच्या देवळात जाऊन येतो . असं सांगून माझ्यावर बहिणीची जबाबदारी देऊन दोघी निघून गेल्या. मुलगा व्हावा हेच साकड घालायला गेल्या होत्या. त्यांना मध्ये अनंत चतुर्दशी मुळे एक मोठी मिरवणूक लागली. त्यामुळे त्यांना काही काळ अडकून पडावे लागलं होतं.पण इकडे बहिणीला बाळंतपणाच्या कळा सुरू झालेल्या. मी फक्त पंधरा ते वीस वर्षांच्या दरम्यानची बहुतेक अठरा वर्षांची असेन. . मला काय करावे कळेना .तिथलेच काही कपडे बॅगेत भरले आणि ताईला घेऊन तिने सांगितल्याप्रमाणे चालत प्लाझा टॉकीज पासून दादरच्या कबूतर खान्यापर्यँत दंडांना आधार देत चालत नेले. कारण गणपती विसर्जनामुळे कोणते वाहन मिळेना. थोड्यावेळाने आई आणि मावशी घरी पोहोचल्यावर त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्याचे कळले. त्यांच्याजवळ किल्ली नव्हतीच त्या धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या अरे हो हॉस्पिटलचे नाव सांगायचं राहिलं हॉस्पिटलचे नाव,” पाटकर हॉस्पिटल”, पण तोपर्यंत ताई बाळंतीण होऊन मुलगा झालेला होता. दोन मुलींवर झालेला मुलगा मला फार आनंद झाला सिस्टरनी माझ्याकडे आणून दिला. हे छोटसं बाळ पकडताना मात्र जरा तारांबळ झालीच. तेवढ्यात सिस्टर येऊन म्हणाली,”बाळाचे दोन्ही कान पकडून ठेवा, गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील आवाजाने बाळाच्या कानाला त्रास होईल”
मी घाबरून व्यवस्थित त्याचे कान पकडून बसलेली होते. तेवढ्यात लेबर रूम पासून विक्रम गोखले त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन माझ्यासमोर आले. मला नाव विचारले. मी नीलांबरी गोखले म्हणून सांगितले त्यांना आनंद झाला म्हणाले,”म्हणजे मी तुमचा आडनाव बंधू विक्रम गोखले,”
मी म्हटलं ,”ओळखले.”ते पुढे म्हणाले,”मला हिला घाईने हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला लागले म्हणून कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही.
तुम्ही जर माझ्या मुलीला एक दहा मिनिटं सांभाळणार असाल तर मी खाली जाऊन काही फोन करून येतो धरणार का?”
मी आश्वासक हसत दुसरा हात पुढे केला. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लेकीला माझ्या हातात दिले अगदी विश्वासाने आणि ते झटकन फोन करायला निघून गेले. तेवढ्यात एक मिरवणूक पुन्हा आली ! मी आता काय करावे या विवंचनेत असताना दोघांना पोटाशी धरून त्यांचे एक एक कान दाबून धरले आणि दुसऱ्या दोन्ही हाताने त्या दोघांचे उरलेले कान बंद केले. मी बरोबर वीस मिनिटे बसून होते. तेवढ्यात आई आणि मावशी आल्या. आणि त्यांच्या पाठोपाठ विक्रम गोखले सुद्धा.
मी आमच्या बाळाच्या बरोबर त्यांच्याही लेकीच्या पण कानांची आवाजा पासून काळजी घेतली. हे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. मी एवढेच म्हटलं,”दोन्ही माझीच की भाचर. एक माझ्या बहिणीचे बाळ दुसरा माझ्या भावाचं बाळ नाही का?”माझ्या आई आणि मावशी समोर त्यांनी माझे कौतुक केले. आणि बाळ त्यांनी ताब्यात घेतले
आता या गोष्टीला ४६ वर्षे झाली पण मला अजून त्यांची दुसरी मुलगी गोरी पान निळ्या डोळ्यांची आठवत असते.
आता ती मुलगी मोठी झाली असणार आहे.
पण माझी आठवण अजून ताजी आहे काल घडल्यासाखी
डॉ नीलांबरी गानू