You are currently viewing कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी पर्यंतचा राज्यमार्ग होणार दर्जोन्नत: आ. नितेश राणे

कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी पर्यंतचा राज्यमार्ग होणार दर्जोन्नत: आ. नितेश राणे

देवगड

कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरापर्यंतचा रास्ता आता दर्जात्मक होणार आहे. कारण कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी तारामुंबरी-देवगड हा ६ कि. मी. असलेला इजिमा क्र. २२ हा प्रमुख जिल्हा मार्ग विशेष बाब म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत गुरुवारी शासन निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आ.नितेश राणे यांनी दिली. त्यामुळे देवगडहून कुणकेश्वरला जाणारा मार्ग पर्यटक स्थानिकांसाठी सुलभ होणार आहे.

कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी तारामुंबरी – देवगड हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाल्याने पर्यटक व – स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही या रस्त्यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. देवगड- कुणकेश्वर जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर सतत रहदारी असते. कुणकेश्वर देवालय ते मिठमुंबरी-तारामुंबरी-देवगड राज्य मार्ग १७८ ला मिळणारा इजिमा क्र. २२ प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला होता.

या रस्त्यावरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्याचा होणारा वापर तसेच प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिलेली मान्यता विचारात घेण्यात आली आहे. देवगड येथील बाजारपेठ, हायस्कूल, कालेज, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय व देवगड येथील लोकांना मिठमुंबरी बीच, कुणकेश्वर मंदिर येथे जाण्याकरिता सोयीचे होणार आहे.

तसेच देवगड ते कुणकेश्वर मंदिरमधील अंतर कमी होऊन इंधन व वेळेत बचत होणार आहे. म्हणून हा रस्ता होणे आवश्यक होते. त्यामुळे एक विशेष बाब म्हणून हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा