*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मनमुक्त….*
बंध मुक्त होवोनिया मनमुक्त मी जगावे
प्रात:काली पहाटेस सांगा कशाला उठावे?
नाही कशाचीच घाई मस्त लोळत पडावे
मन वांछिल ते ते च रोज रोज हो घडावे….
जावे रानात वनात मऊ गवत लुभावे
दंवबिंदुंचे मी चाळ रोज पायात घालावे
बांधा बांघावर पहा कशी गवताची दाटी
जणू शृंगारले पहा रोज रोज माझ्या साठी…..
हरबऱ्याचे ते तुरे हातानेच मी खुडावे
कांदा फोडून हाताने त्यास चवीने चाखावे
ठेचा मिरची भाकर हरबऱ्याचे ते तुरे
पक्वान्नाला लाजविल कुठे मिळेल हो बरे?
तृप्त ढेकर देऊन तरूतळी पहुडावे
वर आकाशात डोळे गाणे मनात म्हणावे
डोळा लागावा स्वप्नात थोडी चालवावी मोट
मेरेतून झुळूझुळू जावे शिवारात थेट ….
पिके डोलती शेतात वारा गातोच अंगाई
येती गुराखी शेतात तेवढ्यात घाई घाई
गाई गुरांचे ते खूर धूळ धावपळ त्यांची
किती मजेची असते सांजवेळ हो खेड्याची…
असे वाटते जगावे पण ….शक्य होत नाही
कसे अडकलो असे सदा मरणाची घाई
नवा जन्मच मिळावा त्याच्या साठी मला वाटे
सल जाईल निघून सारे होईल गोमटे….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २७/११/२०२२
वेळ : दुपारी ३