*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतीम लेख*
*मॉल संस्कृती….!!*
मॉल….!
वाण्याच्या किराणा दुकानातून गरज असेल तेवढं सामान आणायचं…नोकरदार असतील तर महिन्याला लागेल तेवढंच सामान खरेदी करायचं… वर्षातून एकदा, दोनदा सणासुदीला कपडे खरेदी…ते सुद्धा मोजून मापून, पैशांचा अंदाज घेत… आणि लग्नाला आहेर, आंदण दिलेली भांडी संसाराला कायमस्वरूपी वापरणे… अशी असायची सर्वसामान्य लोकांची मानसिकता…. मानसिकता का? तर परिस्थितीच तशी असायची….!
सामाजिक स्तर बदलला…लोकांची आर्थिक परिस्थिती बदलली, स्तर उंचावला तशी बाजारांची व्याप्ती वाढली आणि आपसूकच लोकांच्या गरजा…! हायफाय सोसायच्या झाल्या…तशी काचेची तावदाने लावलेली महागडी दुकाने उभी राहिली. हळूहळू बेसुमार महागाई वाढत गेली आणि सर्वसामान्य लोकं पुन्हा स्वस्ताई कुठे आहे ते शोधू लागली…तर पैसेवाले श्रीमंत लोक आपल्या राहणीमानास योग्य अशा मोठमोठ्या दुकानांमधून खरेदी करू लागले. इंग्रज भारतावर राज्य करून कधीच गेले परंतु इंग्रजांची मॉल संस्कृती मात्र भारतीयांवर राज्य करू लागली. लोकांच्या गरजा ओळखून धनिकांनी शेअर्स आधी माध्यमांचा आधार घेत ए मार्ट, बी मार्ट असे डी मार्ट, एन मार्ट देशभर मोठमोठ्या शहरात उभे राहिले. अशा बाजारांनी एक गोष्ट केली ती म्हणजे मुख्य बाजारपेठेत न परवडणारे दर म्हणून स्वतःची भली मोठी इमारत कमी किमतीत जागा घेऊन शहरांच्या वेशीवर उभी केली. म्हणजे तिथेही बचत आणि लोकांना प्रवास खर्चाचा भुर्दंड….आणि शहरातील व्यापाऱ्यांची देखील ओरड नाही असा तिहेरी विचार…!
मॉल ही भारतीय संस्कृती नाही ती परदेशी…! परंतु आपल्याकडे आपलं बांधायचं कासोट्याला तशी परिस्थिती आहे… नवीन काही आलं की ते पटकन स्विकारायचं अगदी वाह व्वा गाजावाजा करायचा, डोईवर घेऊन नाचायचं आणि आपल्याला मात्र दुर्लक्षित करायचं. मॉल आले आणि शहरातील दुकाने, पिढ्यानपिढ्या…आयुष्यभर उधारी देऊन वर्षभर उधार चुकतं होण्याची वाट पाहणारा वाणी मात्र विसरले. वाण्याकडून, शहरातील किराणा माल दुकानातून आठवडा, महिना गरजेचं सामान आणणारे मॉल मधून गाड्या भरून खरेदी करू लागले….का? तर म्हणे स्वस्त भेटतं….! हो, काहीअंशी काही वस्तू स्वस्त भेटतात, कारण मॉल वाले कंपनी अथवा विक्रेत्यांकडून खरेदी करताना घाऊक खरेदी करतात, त्यामुळे त्यांना कमी किमतीत माल भेटतो आणि स्वस्त विकणे सहज शक्य होतं. आपले शहरातील दुकानदार तोच माल कमी प्रमाणात खरेदी करतात आणि जास्त नफा कमविण्याच्या नादात कधी कधी अक्षरशः लूट करतात तिथे मॉल मध्ये २५% तरी पैसे वाचतात. परंतु खरंच, आपल्याला आपण घेतलेल्या सामानाची गरज होती का? आपण डाळ, तांदूळ, गहू, चहा, साखर, मोजकी कडधान्ये घेता घेता सर्व जिन्नस ५/१० किलोच्या मापात घेतले. जे जिन्नस गरजेचे नव्हते असे काही तर कमी दरात आहेत म्हणून खरेदी केले आणि जिथे महिना ७/८ हजारात खर्च भागत होता तिथे तब्बल १५ हजारांची खरेदी झाली. गरज नसताना कपडे घेतले गेले, वायफळ खरेदी झाली त्यामुळे घरात पडून राहिलेल्या जिन्नसांना कीड लागली, खराब झाले अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे मॉल संस्कृती ही बऱ्याचदा अनावश्यक खरेदीमुळे सर्वसामान्यांना मारक ठरते.
मॉल संस्कृतीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. घरातून जातानाच गरजेच्या वस्तूंची यादी काढायची… आणि लागतील तेवढ्याच खरेदी करायच्या. उगाच किंमत कमी आहे अशी हवा डोक्यात न जाऊ देता, यादीत ठरलेली खरेदी होताच मागे पाय घ्यायचा. नक्कीच त्यामुळे बचत होते. स्वस्त आहे म्हणून १ किलोची गरज आहे तिथे ५ किलो घेणे म्हणजे आपले ५ महिन्यांचे आगाऊ पैसे मॉलला देण्यासारखेच आहे. म्हणजे मॉलला बिन व्याजी चौपट रक्कम मिळाली. त्याबदल्यात मालाची वापरण्याची तारीख जवळ आलेली वस्तू आपण घेऊन आलो आणि मॉलचे होणारे नुकसान वाचवून आपलं नुकसान करून घेतलं. अनेक वस्तू, कपडे मुदत संपत आली की मॉलमध्ये किंमत कमी केली असे दाखवून आधीच वाढवलेल्या किंमतीवर ५०% सुद्धा सूट दिली जाते आणि आपले नुकसान न होताच ती ग्राहकांच्या आपसूकच गळी उतरवली जाते. मॉल या शब्दांवर भाळलेले लोक *सूट* हा शब्द वाचूनच खरेदी करतात आणि फसतात. खरेदी केलेले कपडे काही दिवसात खराब होतात. त्यामुळे पैसेही वाया जातात. काही उच्चभ्रू मॉल मध्ये तर सामान, कपडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते पण उसने मोठेपणा दाखविण्यासाठी काही लोक खिशाच्या ओझ्यापेक्षा जास्त खरेदी करून स्वतः लुटले जातात आणि धनिकांची घरे भरतात.
मॉल संस्कृतीमुळे होणारे फायदे आणि तोटे आदींचा विचार केला असता खरोखरच मॉल गरजेचे आहेत का? असा प्रश्न नक्कीच सर्वांच्या मनात उपस्थित होतो.
काहीजण प्रश्नच होकारार्थी उत्तर देतील कारण ते गरजेपुरती खरेदी करतात आणि बचत होते म्हणून आनंदी असतात, परंतु जास्तीतजास्त लोक मात्र अनावश्यक खरेदी करून फसतात, त्यामुळे सारासार विचार ते जेव्हा करतात तेव्हा मात्र नकारार्थी उत्तरावर येऊन थांबतात. प्रत्येकाच्या गरजेनुसार प्रत्येकाचं मत बनत असतं. परंतु वैयक्तिक माझंही मत अनावश्यक खरेदी होत असल्याने मॉल संस्कृतीची म्हणावी तेवढी आवश्यकता नाही. एक गोष्ट मॉल मध्ये सर्वांनी विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही दमलात म्हणून तुम्हाला बसायला कुठेही जागा नसते, कारण लोकांनी विचार करावा आणि खरेदी करावी अशी संधी मॉल कधीही देत नाही कारण झटपट विचार न करता खरेदी करणारे ग्राहकच त्यांना तारून नेतात.
नोकरीच्या दृष्टीने विचार केला असता, सर्वसामान्य बेरोजगारांना ८/१० हजारांची नोकरी मिळते, कसंबसं घर चालतं, पण १२/१२ तास उभं राहून हातापायाची हाडे मोडकळीस येतात एवढं मात्र नक्कीच…! परंतु अशा नोकऱ्यांमुळे छोट्या मोठया कामांसाठी मात्र नोकर मिळणे कठीण झाले आहे. मॉल संस्कृतीचा संपूर्ण विचार केला असता कधी मॉल चांगले वाटतात तर कधी तापदायक…. जसा अंगणातील आम्रवृक्ष फळं देतो तेव्हा हवाहवासा वाटतो आणि वर्षभर कचरा काढताना नकोसा होतो….!
(दीपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६